दैनिक स्थैर्य | दि. ०१ फेब्रुवारी २०२५ | फलटण | फलटण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुकाध्यक्ष पदी श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे, यामुळे राजकीय वर्तुळात एक नवीन चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही नियुक्ती उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशाने करण्यात आली आहे, हे राज्यसभा खासदार नितीन (काका) पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा गट आता नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. गेल्या काही दिवसांपासून राजे गट पुन्हा उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात कार्यरत राहणार असल्याच्या विविध चर्चा ह्या फलटण शहरासह तालुक्यात रंगू लागल्या होत्या. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांची भेट घेतली होती व त्यानंतरच्या बैठकीत त्यांची उपस्थिती दिसल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या.
श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांची नियुक्ती सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात झालेल्या समारंभात जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर यांनी घोषणा केली. या समारंभात खासदार नितीनकाका पाटील, आमदार सचिन कांबळे पाटील, व अनेक मान्यवर उपस्थित होते. श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांच्या नियुक्तीचे अभिनंदन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले आहे.
श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी राजकीय क्षेत्रात अनेक वर्षे काम केले आहे. ते फलटण कृषी उत्पन्न समितीचे सभापती, फलटण पंचायत समितीचे सदस्य व उपसभापती आणि सभापती म्हणून कार्यरत राहिले आहेत. त्यांनी २०२४ साली झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे कामकाज सांभाळले होते.