दैनिक स्थैर्य । दि. २६ एप्रिल २०२२ । सातारा । करंजे-म्हसवे मार्गावरील अग्निमंदिर परिसरात ‘शिवराज्य दरबार’ स्फूर्तीस्थान उभारण्यात येणार असून त्याचे भूमिपूजन 2 मे रोजी सायंकाळी 4 वाजता अक्कलकोट (शिवपुरी) विश्व फाऊंडेशनचे अध्यक्ष प. पू. डॉ. पुरुषोत्तम ऊर्फ राजाभाऊ महाराज यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी सातारा शहराचे माजी नगराध्यक्ष शिवाजीराजे भोसले व ज्येष्ठ विचारवंत प्रा. संभाजीराव पाटणे हे प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत, अशी माहिती श्री. छ. प्रतापसिंह महाराज सेवाधामच्या अध्यक्षा वृषालीराजे भोसले यांनी दिली.
वृषालीराजे भोसले म्हणाल्या, शिवकार्य पुढे न्यावे अशी मातोश्री दिवंगत सौ. चंद्रलेखाराजे भोसले (वहिनीसाहेब) यांची इच्छा होती. सातारा ही स्वराज्याची चौथी राजधानी आहे. श्री. छ. शिवाजी महाराज यांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीने शिवरायांचे अनेक पराक्रम पाहिले. या भूमीत अनेक नररत्ने निर्माण झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास नव्या पिढीसमोर मांडण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी इतिहास अभ्यासक, संशोधक, शिवप्रेमींशी चर्चा करुन सातारा शहराजवळील करंजे येथील करंजे-म्हसवे मार्गावर अग्निहोत्र मंदिर परिसरात ‘शिवराज्य दरबार स्फूर्तीस्थान’ साकारण्याचा मानस आहे. या स्फूर्तीस्थानात शिवरायांचे पराक्रम व त्यांच्या जीवनातील काही महत्वपूर्ण घटना म्यूरल्सच्या माध्यमातून चितारण्याचा प्रयत्न आहे.
त्यामध्ये राजमाता जिजाऊ-शिवराय (शिवनेरी), स्वराज्य प्रतिज्ञा, प्रतापगडावरील पराक्रम, आग्र्याहून सुटका, शिवराज्याभिषेक अशा निवडक प्रसंगांचा समावेश असेल. या स्फूर्तीस्थानाला भेट देणार्या शिवप्रेमींना शिवरायांचे जीवनकार्य 3 डी चित्रफितीद्वारे पहायला मिळेल, अशी व्यवस्था केली जाणार आहे. या स्फूर्तीस्थानाचा लूक ऐतिहासिक असेल. शिवरायांचा जीवनपट मांडणारे पहिले स्फूर्तीस्थान राजधानी सातारा येथे उभारले जात आहे, याचा आनंद होत आहे. ‘शिवराज्य दरबार स्फूर्तीस्थान’ तरुण पिढीला नक्की प्रेरणा देणारे ठरेल, असा विश्वासही वृषालीराजे भोसले यांनी व्यक्त केला.