ठेवीदारांची सुमारे ३६ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी शिवजीत मुद्रा मल्टीस्टेट को-ऑप. सोसायटीच्या चौघा संचालकांना पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ३० ऑगस्ट २०२३ | फलटण |
फलटण येथील शिवजीत मुद्रा मल्टीस्टेट को-ऑप. सोसायटीतील ठेवीदारांची ३६ लाख २८ हजार ७८७ रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश (१) ए. एस. जाधव यांनी चौघांना पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि प्रत्येकी ५० हजारांचा दंड व दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

अध्यक्ष मंदाराणी शिवाजी ढमढेरे, चेअरमन शिवाजी तुकाराम ढमढेरे (रा. पिंपळगाव, ता. दौंड, जि. पुणे), व्यवस्थापक रंजना रामचंद्र निकम, विक्रम रामचंद्र निकम (रा. भाडळी बुद्रुक, ता. फलटण, जि. सातारा) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याबाबत माहिती अशी, फलटण येथे शिवजीत मुद्रा मल्टीस्टेट सोसायटीची शाखा स्थापन करून वरील संशयितांनी बचत ठेव, शेअर्स, पिग्मी, बचत गट, धनवर्षा, लकी ड्रॉ कुपन, एटीएम कार्ड अशा प्रकारच्या सुविधा देऊन ठेवीदारांना आकर्षित केले. मात्र, मुदत पूर्ण झाल्यानंतरही अनेक नागरिक व महिलांचे पैसे परत केले नाहीत. एकूण ३६ लाख २८ हजार ७८७ रूपयांची ठेवीदारांची फसवणूक केली. या प्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात वरील आरोपींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता.

आर्थिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक ए. एस. गायकवाड यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सुनावणीदरम्यान एकूण १८ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षीदारांच्या साक्षी ग्राह्य धरून न्यायालयाने शिवजीत मुद्रा सोसायटीच्या चौघांना पाच वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

या खटल्यासाठी उपविभागीयअधिकारी राहुल धस, पोलिस निरीक्षक सुनिल शेळके, पैरवी अधिकारी सहायक फौजदार संजय पाटील, अमोल घोरपडे यांनी परिश्रम घेतले. पोलिस प्रॉसिक्यूशन स्कॉडचे पोलिस उपनिरीक्षक उदय दळवी, पोलिस उपनिरीक्षक सुनिल सावंत, शशिकांत गोळे, हवलादार गजानन फरांदे, अमित भरते यांनी सरकार पक्षाला योग्य ती मदत केली.


Back to top button
Don`t copy text!