कामेश कांबळेला योग्य वेळी सन्मानपूर्वक संधी देणार; मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा कार्यकर्त्यांना शब्द


सातारा जिल्हा परिषद सभापती पदाच्या निवडीत कामेश कांबळेला संधी न मिळाल्याने नाराज झालेल्या समर्थकांना मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी धीर दिला आहे. कामेशवर अन्याय होऊ देणार नाही, योग्य वेळी योग्य संधी देणार, असा शब्द त्यांनी दिला आहे.

 स्थैर्य, सातारा, दि. ५ एप्रिल : “कामेश कांबळे हा कालही माझ्या विचारांचा होता आणि आजही माझ्याच विचारांचा आहे. राजकारणात काही वेळा पेच निर्माण होतो, त्यामुळे जिल्हा परिषद सभापती पदावर त्याला यावेळी पोहोचवता आले नाही. मात्र, कामेशला योग्य वेळी सन्मानपूर्वक संधी नक्की दिली जाईल,” असा ठाम शब्द राज्याचे मंत्री आणि साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला आहे. तसेच, त्याच्या समर्थक आणि सहकाऱ्यांनी नाराज न होता कोणतीही काळजी करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

स्व. भाऊसाहेब महाराजांच्या विचारांचा पाईक

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी म्हटले आहे की, स्व. भाऊसाहेब महाराज यांच्या विचारांनी प्रेरित होऊन कामेशने तरुण वयातच समाजकारण सुरू केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने चांगली तरुण फळी उभी केली. त्यांच्या पश्चात तो माझ्यासोबत समाजकारणात सक्रिय राहिला. नुकत्याच झालेल्या सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत त्याने भाजपकडून उमेदवारी मागितली होती. त्यासाठी मीही प्रयत्न केले, मात्र काही अडचणींमुळे त्याला भाजपची उमेदवारी मिळाली नाही. तरीही समाजकारण चालू राहावे, यासाठी त्याने राष्ट्रवादी पक्षातून निवडणूक लढवली.

देवेंद्र फडणवीसांनीही घेतली आहे दखल

कामेश हा कायमच माझ्या विचारांचा राहिला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवेळी त्याने जी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, त्याची दखल खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे. याशिवाय संपूर्ण जिल्ह्याने आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनीही त्याच्या कामाची दखल घेतली आहे.

‘आमदार म्हणून माझा शब्द आहे’

जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापती निवडीमध्ये कामेशला संधी मिळावी, असे वरिष्ठ पातळीवर निर्णय झाले होते. मात्र, निवडणूक किंवा राजकारणात काही वेळेला समोर पेच निर्माण झाला की काही निर्णय मागे घ्यावे लागतात.

यामुळे कामेश कांबळेच्या कार्यकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला असून, राजकीय वर्तुळात या भूमिकेची चर्चा रंगली आहे.

“यावेळी कामेशला सभापती पदावर पोहोचवता आले नाही, पण त्याच्यावर कोणताही अन्याय होणार नाही. एक आमदार, लोकप्रतिनिधी आणि मंत्री म्हणून मी कामेश व त्याच्या सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम उभा आहे. यावेळी नाही जमलं पण, योग्य वेळी योग्य संधी देऊन कामेशचा सन्मान निश्चितच करू,” असा शब्द शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला आहे.


Back to top button
Don`t copy text!