दैनिक स्थैर्य । दि. ०४ डिसेंबर २०२१ । सातारा । सातारा शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदासाठी जोरदार फिल्डिंग लावली असून सलग दोन दिवस मुंबईत तळ देऊन आधी उपमुख्यमंत्री अजित पवार व शुक्रवारी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याने राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता आहे. दरम्यान ना. रामराजे नाईक निंबाळकर, ना. बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील यांनीही शरद पवार यांची भेट घेत जिल्हा बँकेचा अध्यक्ष राष्ट्रवादीचा असावा असा आग्रह धरल्याची खात्रीशीर माहिती आहे.
जिल्हा बँक निवडणुकीमध्ये भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याशी उत्तम समन्वय ठेऊन स्वतःची जागा बिनविरोध केलीच शिवाय स्वतःच्या विचाराचे सहा संचालक त्यांनी निवडून आणले. आमदार शशिकांत शिंदे यांना ज्ञानदेव रांजणे यांच्या माध्यमातून पराभवाचा धक्काही दिला. त्यांनतर जिल्हा बँक अध्यक्ष पदासाठीही जोरदार फिल्डिंग लावली आहे. बाबाराजे यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन अध्यक्षपदासाठी पुन्हा संधी देण्याची केवळ गळच घातली व अजितदादा हे रामराजे यांच्याशी नक्कीच चर्चा करतील असा शब्द सुध्दा घेतला. याच दरम्यान विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादीचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेत जिल्हा बँकेचा अध्यक्ष राष्ट्रवादीचा असावा असा आग्रह धरल्याचे वृत्त आहे.
आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी शुक्रवारी मुंबईतच तळ देऊन शरद पवार यांची सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली . आपण स्व . अभयसिंह महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारण करत आहात, अध्यक्ष या नात्याने बँकेची जबाबदारी सुध्दा आपण सक्षमपणे सांभाळली. या शब्दात शरद पवार यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे कौतुक केले. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी पुन्हा संधी देण्यात यावी अशी गळ त्यांनी शरद पवारांना घातली. या विषयावर तुम्ही अजीत पवार व रामराजे नाईक निंबाळकर यांच्याशी चर्चा केली का ? या प्रश्नांवर शिवेंद्रराजे यांनी होकार दिला. उभयतांशी मी चर्चा करतो असे आश्वासन पवार यांनी दिले. या घडामोडीमुळे
शिवेंद्रसिंहराजे दुसऱ्यांदा अध्यक्ष होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादीतून नितीन पाटील व राजेंद्र राजपुरे, सत्यजितसिंह पाटणकर यांचीही नावे चर्चेत आहे. येत्या ६ तारखेच्या विशेष सभेत अध्यक्षपदाची निवड करावयाची आहे. त्यामुळे शनिवारी राष्ट्रवादीची महत्वपूर्ण बैठक रामराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत होणार असण्याची शक्यता असून बैठकीत जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचे नाव शरद पवारांशी बोलून निश्चित केले जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीच्या सूत्रांनी दिली.