दैनिक स्थैर्य । दि. २७ सप्टेंबर २०२१ । सातारा । अतिवृष्टीमुळे आणि डोंगर, दरडी कोसळल्याने जावली तालुक्यातील वाटंबे गावाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन वाहून गेल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी वाटंबे गावाला आवश्यक असणारी ५०० मीटर पाईप स्वखर्चातून उपलब्ध करून दिल्याने या गावचा पाणीप्रश्न सुटला आहे.
वाटंबे गावाला काळा कडा येथून सायफन पद्धतीने पाणीपुरवठा केला जातो. काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टी आणि दरड कोसळल्याने पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन तुटून वाहून गेली. यामुळे गावात पाणीटंचाई होऊ लागली. ग्रामस्थांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांना पाणीप्रश्न सोडवण्याची मागणी केली. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी तात्काळ स्वखर्चातून लागणारी पाईप ग्रामस्थांना उपलब्ध करून दिली. यामुळे वाटंबे येथे निर्माण झालेला पाणीप्रश्न सुटला. सदर पाईप मोहन भणगे, माजी सरपंच दत्तात्रय भणगे, उप सरपंच सुरेश कांबळे, सदस्य विकास भणगे, बबन घाडगे, किरण भणगे, सागर मोरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
याबद्दल वाटंबे ग्रामस्थांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे आभार मानले. दरम्यान, लवकरच वाटंबे गावाचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवू, असा शब्द आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी याप्रसंगी ग्रामस्थांना दिला.