समाजाची परिस्थिती विचारात घेता सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
स्थैर्य, सातारा, दि.११: मराठा सकल समाज जाे निर्णय घेईल त्या निर्णयासाेबतच राहणार असल्याचे भारतीय जनता पक्षाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा येथे स्पष्ट केले. आमदार भोसले यांच्या भुमिका जाणून घेण्यासाठी माध्यमांनी त्यांना साताऱ्यातील सुरुची बंगला येथे गाठले. त्यावेळी ते बोलत होते.
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्याच्या निर्णयामुळे राज्यासह सातारा जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. इतर राज्यांच्या 50 टक्के आरक्षणाला स्थगिती न देता खटला सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडे वर्ग करण्यात आला असताना मराठा आरक्षणाबाबतच दुजाभाव का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तसे समाजाची परिस्थिती विचारात घेता सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या निर्णयाच्या फेरविचाराबाबत याचिका दाखल करण्याचा निर्धारही करण्यात आला. राज्य व केंद्र दोन्ही ठिकाणी सत्तेत असलेल्या पक्षांनी आपली सर्व ताकद समाजाच्या हितासाठी लावावी अन्यथा रोषाला समारे जावे लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.
आज (शुक्रवार) माध्यमांनी भारतीय जनता पक्षाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांची भुमिका जाणून घेण्यासाठी त्यांना गाठले. त्यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, आरक्षणाला स्थगितीमुळे आज मराठा समाजावर अन्याय झाला आहे. याबाबत राज्य सरकारकडून बाजू निटशी मांडली गेली का, हे तपासून पाहणे गरजेचे आहे. याचे परिणाम समाजावर काय होतील, याचा विचार करावा लागणार आहे. या समाजाने शांततेच्या मार्गाने केलेली आंदोलने, मोर्चे आणि अनेकांनी बलिदानही दिले. त्याचे फळ मिळालेले नाही. आता सरकारने न्यायालयाने दिलेली स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्न करावा, तरच मराठा समाजाला न्याय मिळेल.
मराठा समाज जी भुमिका घेतली जाईल. त्या निर्णयासाेबतच राहणार आहाेत. समाज म्हणून जी भुमिका राहील त्यास विराेध नसणार. पुन्हा रस्त्यावर उतरण्याची वेळ आली, अन्य काही निर्णय झाले तर ते अंमलात आणू असेही त्यांनी स्पष्ट केले.