दैनिक स्थैर्य । दि.०३ फेब्रुवारी २०२२ । सातारा । साताऱ्यातील एका कंपनीची जागा आ. शिवेंद्रसिंहराजेंनी लिलावात विकत घेतली. कामगारांच्या थकीत पगारावरून कंपनीच्या कामगारांनी आक्रमक होत सामुदायिक आत्मदहनाचा प्रयत्न केला. ही जागा आम्ही लिलावातून विकत घेतली असून कामगारांच्या थकीत पगाराशी आमचा काही संबंध नाही. कामगारांनी बँक ऑफ बडोदाशी यासंदर्भात चर्चा करावी असे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले आहे.
साताऱ्यातील पंडित ऑटोमोटिव्ह प्रा. लि. कंपनीची जागा थकीत कर्जात बँक ऑफ बडोदा, एनसीएलटी कडून लिलावात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतली. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कंपनीची जागा खरेदी केल्याने कामगार आक्रमक झाले होते. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. दरम्यान, ही जागा आम्ही लिलावातून विकत घेतली असून कामगारांच्या थकीत पगाराशी आमचा काही संबंध नाही. कामगारांनी बँक ऑफ बडोदाशी यासंदर्भात चर्चा करावी, असे स्पष्टीकरण आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले आहे.
थकित पगारासाठी पंडित ऑटोमोटिव्हच्या कर्मचाऱ्यांनी सामुदायिक आत्मदहनाचा प्रयत्न केला. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच कामगारांना रोखले. यासंदर्भात आंदोलनकर्त्यां कामगारांनी सांगितले की, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ही जागा खरेदी केल्याने कामगार आक्रमक झाले होते. कामगारांना रातोरात बेदखल केले आहे. आमच्यावर उपासमारीची वेळ आली असून चार वर्षे झाले पगार नाहीत. कामगारांना रस्त्यावर आणण्याचे काम आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी केले आहे. आम्हाला कंपनीत जाऊन दिले जात नाही. राजाच अन्याय करत असेल तर आम्ही कोणाकडे न्याय मागायचा असा प्रश्न कामगारांनी उपस्थित केला आहे. गुंड आणून कामगारांना रोखले जात आहे. कंपनीची ४० कोटींची जागा आठ कोटींना विकल्याचा आरोपही कामगारांनी केला आहे.
यासंदर्भात आमदार शिवेंद्रसिंहराजेंशी संपर्क केला असता ते म्हणाले, या कंपनीची जागा एनसीएलटीच्या लिलावातून आम्ही विकत घेतली आहे. कामगारांच्या थकीत पगाराशी आमचा काही संबंध नाही. कामगारांनी बँक ऑफ बडोदा, एनसीएलटी यांच्याशी चर्चा करावी. आम्ही कायदेशीररित्या ही जागा घेतली असून माझ्याच प्रॉपर्टीमध्ये मला जाण्यास विरोध करणे हा गुन्हा आहे. आमदार म्हणून मी व्यवसाय करायचा नाही का, आम्ही इन्कम टॅक्स भरतोय ही चूक करतोय का, असा सवाल शिवेंद्रसिंहराजेंनी उपस्थित केला आहे.