दैनिक स्थैर्य । दि. 30 नोव्हेंबर 2021 । फलटण । प्रसन्न रूद्रभटे । फलटण तालुक्याचे युवा नेते तथा सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित संचालक श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर – निंबाळकर यांना जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी द्यावी, अशी मागणी फलटण तालुक्यातून जोर धरु लागली आहे.
फलटण तालुक्यातील ज्येष्ठ नेते स्व.श्रीमंत दादाराजे खर्डेकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जिल्हा बँकेच्या संचालकपदी श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांची बिनविरोध निवड झाली होती. तद्नंतर नुकत्याच झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणूकीत श्रीमंत शिवरुपराजे पुन्हा एकदा संचालक म्हणून बिनविरोध निवडून आले आहेत. फलटण पंचायत समिती, फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती या संस्थांच्या सभापतीपदाच्या माध्यमातून त्यांनी उत्तम कामगिरी बजावली असून त्यांना ग्रामीण अर्थव्यवस्थेविषयी चांगली माहिती आहे. त्यामुळे जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या व सर्वसामान्य शेतकर्यांचा आत्मा समजल्या जाणार्या जिल्हा बँकेचे उपाध्यक्षपद ते सक्षमपणे सांभाळतील, असा विश्वास तालुकावासियांमधून व्यक्त होत आहे.
सातारा जिल्हा बँकेची कामगिरी लक्षणीय आहे. अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी बँकेचा आजवर अनेकदा गौरव झालेला आहे. त्यामुळेच सहकार, कृषी क्षेत्रात काम करणार्या जिल्ह्यातील अनेक बड्या नेत्यांची बँकेवर संचालक म्हणून काम करण्याची इच्छा असते मात्र सर्वांनाच ते शक्य होत नाही. संचालक पदी निवडून येतानाही कित्येकांची पुरी दमछाक होते. मात्र श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांनी बिनविरोध संचालक होण्याचा करिष्मा साधला आहे. नवनिर्वाचित संचालक मंडळामध्ये सर्वपक्षीय सहकार पॅनेलची सत्ता आहे. विधानपरिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हेच या पॅनेलचे प्रमुख मार्गदर्शक आहेत. त्यामुळे ना.श्रीमंत रामराजे यांनी तालुकावासियांच्या भावना लक्षात घेवून श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांना बँकेच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळण्याची संधी द्यावी. श्रीमंत शिवरुपराजे नक्कीच या पदाला साजेसे काम करतील, असा विश्वासही फलटणकरांमधून व्यक्त होत आहे.