
स्थैर्य, सातारा, दि.17 ऑक्टोबर : घारेवाडी (ता.कराड) येथील शिवम् आध्यात्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठानाच्यावतीने गुरुजन हृदय संमेलनाचे रविवार (दि. 26) व सोमवारी (दि. 27) आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाचे हे आठवे वर्षे आहे. राज्यभरातील शिक्षक व शिक्षणप्रेमींचा प्रतिवर्षी उत्स्फूर्त व वाढता प्रतिसाद मिळत आहे. यंदा हे संमेलन घारेवाडी येथील शिवम आनंदधाम येथे होणार आहे. या संमेलनाचे रविवारी (दि. 26) सकाळी 10 वाजता उद्घाटन होणार आहे.
पहिल्या सत्रात अध्यापनकौशल्य या विषयावर पुणे येथील शिक्षण तज्ज्ञ राजीव तांबे मार्गदर्शन करतील. दुपारच्या दुसर्या सत्रात पुणे येथील खेळघरच्या संस्थापिका शुभदा जोशी यांचे सकारात्मक शिस्त या विषयावर व्याख्यान होईल. दुपारी तीन वाजता तिसरे सत्र सुरू होऊन मंगळवेढा येथील सुलेखनकार अमित भोरकडे हे कृतिसत्र सुलेखन या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी पाच वाजता चौथे सत्र सुरू होऊन या सत्रात कणेरी मठातील योगगुरू दत्ता पाटील हे संगीतमय कवायत विषयावर मार्गदर्शनकरतील.
सायंकाळी सहा वाजता सुरू होणार्या पाचव्या सत्रात धनगरवस्ती शाळेचे उपक्रमशील शिक्षक लहू बोराटे, अहिल्यानगर येथील महामानव बाबा आमटे सेवा भावी संस्थेचे अनंत झेंडे व परभणीच्या सेलू येथील उपक्रमशील शिक्षक युवराज माने हे गुरुगोष्टी ज्ञानसंवाद या विषयावर मार्गदर्शन करतील. रात्री साडेआठ वाजता वारणा कोडोली येथील कवी बाबा वडर व अकोला येथील कवी अनंत राऊत यांची काव्य मैफील होईल. सोमवारी (दि. 27) सकाळी सहा वाजता चिपळूण येथील निसर्ग मित्रमंडळाचे भाऊ काटदरे निसर्ग भ्रमंती या विषयावर माहिती देतील.
आठव्या सत्रात वित्त विभागाचे सहाय्यक संचालक व लेखक राहुल कदम हे शिकवणे ही शिकण्याचीच कला या विषयावर व्याख्यान देतील. नवव्या सत्रात एमकेसीएल, पुणे येथील ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ विवेक सावंत कृत्रिम बुद्धिमत्ता व शिक्षण या विषयावर मार्गदर्शन करतील, तर दुपारी शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजित देशमुख संमेलनाचा समारोप करतील.