शिवाजी विद्यापीठातील एमबीए अभ्यासक्रम जागतिक दर्जाचा – कुलसचिव प्रा. डॉ. विलास नांदवडेकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १५ जुलै २०२१ । कोल्हापूर । ‘‘शिवाजी विद्यापीठाचा एमबीएचा अभ्यासक्रम हा जागतिक दर्जाचा असून या अभ्यासक्रमाचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा’’, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य आणि व्यवस्थापन विभाग आणि शिवाजी विद्यापीठ मॅनेजमेंट टीचर्स असोसिएशन (सुम्टा) यांच्यावतीने आयोजित करिअर कनेक्ट या वेबिनारच्या अध्यक्षपदावरुन बोलत होते. या वेबिनारचे प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाचे विभागप्रमुख डॉ. एस. एस. महाजन होते.तर यावेळी यावेळी सुम्टाचे सचिव प्रा. डॉ.विनोद बाबर यांची प्रमुख उपस्थित होते. पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेले आणि पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षात बसलेल्या विद्यार्थ्यांना एमबीए अभ्यासक्रम आणि प्रवेश प्रक्रियेची माहिती व्हावी यासाठी या वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बोलताना डॉ. नांदवडेकर म्हणाले की, ‘‘सध्याच्या स्पर्धेच्या आणि जागतिकीकरणाच्या युगात चांगले विद्यार्थी घडविणारा अभ्यासक्रम हा शिवाजी विदयापीठाने तयार केला आहे. भविष्यातील चांगले उद्योजक आणि व्यवस्थापक निर्माण होण्यासाठी उपयुक्त असा हा अभ्यासक्रम आहे.’’

यावेळी बोलताना डॉ. एस. एस. महाजन म्हणाले की, ‘‘एमबीए आणि प्रवेश प्रक्रियेची माहिती विद्यार्थ्यांना होण्यासाठी वेबिनार आयोजित करण्याची संकल्पना चांगली आहे. अभ्यासक्रम आणि प्रवेश प्रक्रियेची माहिती पात्र विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी याची मदत होणार आहे.’’

शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र अभ्यास मंडळाचे चेअरमन प्रा. डॉ. सारंग भोला यांनी यावेळी एमबीए अभ्यासक्रमाची संपूर्ण माहिती दिली. तर प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील मार्गदर्शन प्रा. डॉ. प्रविण जाधव यांनी केले. या वेबिनारला कोल्हापूर, सांगली, सातारा तसेच इतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन याचा लाभ घेतला. याप्रसंगी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक सुम्टाचे उपाध्यक्ष डॉ. बी. एस. सावंत यांनी केले तर आभार प्रा. डॉ. दीप्ती बर्गे यांनी मानले. वेबिनारचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. स्वेता मेथा यांनी केले. यावेळी शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील विविध मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्सचे संचालक, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!