सासकल येथे शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव हर्ष उल्हासात विविध कार्यक्रमांनी साजरा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २१ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव अतिशय हर्ष उल्हासात, आनंदाने विविध कार्यक्रमांनी महाराष्ट्रसह संपूर्ण देशभर व जगाच्या कानाकोपर्‍यात साजरा केला जातो. यावर्षी सासकल, तालुका फलटण येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तीन दिवस तरुणांच्या पुढाकाराने जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १६ फेब्रुवारी २०२३ रोजी स्वराज्याचे पहिले सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारा चित्रपट दाखवण्यात आला. १७ फेब्रुवारी २०२३ ला प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ. प श्री.बाळासो एकनाथ झगडे महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन पार पडले. १८ फेब्रुवारी २०२३ ला सुप्रसिद्ध वक्ते सागर महाराज काटकर धर्मपुरीकर यांचे शिवचरित्रावर व्याख्यान संपन्न झाले.१९ फेब्रुवारी २०२३ रोजी शिवजन्मोत्सवानिमित्त पालखी प्रदक्षिणा व मिरवणुकीचा कार्यक्रम संपन्न झाला.

पालखी सोहळ्यामध्ये हलगी वादकांनी रंगत आणली. हलगी या पारंपारिक वाद्यांनी अतिशय रम्य वातावरण निनादून सोडले. पारंपारिक वेशभूषामध्ये आबाल वृद्ध, विद्यार्थी, मुले या छत्रपती शिवजन्मोत्सवानिमित्त शोभायात्रेमध्ये सहभागी झाले होते. सासकल गावचे सर्व समाजातील ग्रामस्थ, आबाल वृद्ध, स्त्री – पुरुष सर्वांनी शिवजन्मोत्सवामध्ये सहभाग घेतला.

यावर्षी गावातील सर्व समाजातील व सर्व मंडळातील तरुणांनी पुढाकार घेऊन एक गाव एक शिवजयंतीचा आदर्श जपत सामाजिक एकोप्याचा मूलमंत्र जपला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सासकल व शिवशंकर माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर आपली मनोगते व्यक्त करून कार्यक्रमाला रंगत आणली. अतिशय पारंपारिक वेशामध्ये संपूर्ण गाव व गावचा परिसर शिवमय झाला होता. सासकल सारखा आदर्श इतरही गावांनी घ्यावा. पक्षीय व गटातटाच राजकारण बाजूला ठेवून तरुणांनी पुढाकार घेतला आणि न भूतो न भविष्यती असा शिवछत्रपतींचा जयंती महोत्सव साजरा केला. प्रत्येक गावामध्ये एक गाव एक शिवजयंतीचा आदर्श जपावा, अशी ग्रामस्थांनी भावना व्यक्त केली.

या महोत्सवासाठी सर्व समाजातील ग्रामस्थांनी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, शिवशंकर माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला व सहभाग घेतला.


Back to top button
Don`t copy text!