स्थैर्य, फलटण, दि. ११: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची परंपरेनुसार गुरुवार, दि.13 मे रोजी जयंती असून, ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर यंदाची शिवजयंती साधेपणाने साजरी होणार असून फलटणकरांनी छत्रपती शिवरायांना प्रत्येकाने आपापल्या घरातच थांबून अभिवादन करावे, असे आवाहन शंकर मार्केट शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष तथा नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना किशोरसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले की, फलटण येथे परंपरेनुसार वैशाख शुद्ध द्वितीयेला शिवजयंती साजरी करण्याची प्रथा आहे. कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे गतवर्षीप्रमाणे यंदाच्यावर्षीही शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय शंकर मार्केट शिवजयंती उत्सव मंडळ, मोती चौक शिवजयंती उत्सव मंडळ, रविवार पेठ शिवजयंती उत्सव मंडळ, शुक्रवार पेठ शिवजयंती उत्सव मंडळ, शिवाजी रोड शिवजयंती उत्सव मंडळ व फलटण शहर शिवजयंती उत्सव समिती यांच्या पुढाकाराने घेण्यात आला आहे. प्रशासनाचे नियम पाळून प्रमुख शिवजयंती उत्सव मंडळांच्या पदाधिकार्यांच्या उपस्थितीत रात्री 12 वाजता शहरातील छत्रपती शिवरायांच्या अर्धपुतळ्यास अभिषेक व सकाळी 9 वाजता पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी या ठिकाणी गर्दी न करता आपल्या घरातूनच छत्रपती शिवरायांना अभिवादन करावे, असे आवाहन किशोरसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह मोती चौक शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष गणेश शिरतोडे, शुक्रवार पेठ शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रितम बेंद्रे, रविवार पेठ शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष विशाल पोतेकर, शिवाजीरोड शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष योगेश शिंदे यांनी केले आहे.