
स्थैर्य, सातारा, दि.२०: हिंदवी स्वराज्य संस्थापक, अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सातारा येथे उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त अवघ्या सातारानगरीत भगवे वातावरण निर्माण झाले होते. कोरोना काळातही शिवप्रेमींचा उत्साह ओसंडून वाहत होता. दरम्यान राज्याच्या विविध भागातून आलेल्या शिवजयंती उत्सव मंडळांनी जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या किल्ल्यावरून शिवज्योती पेटवून आपापल्या गावी नेल्या. यावेळी जय शिवाजी जय भवानीच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. सातारा शहरातील प्रमुख रस्ते, चौकाचौकात भगव्या कमानी लावण्यात आल्या होत्या. चौकाचौकात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवून त्यांना अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचे तसेच शूरवीर मावळ्यांच्या पराक्रमांचे पोवाडे ध्वनीक्षेपकावर लावण्यात आले होते.
दरम्यान, किल्ले प्रतापगडावर शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. याठिकाणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्यासह विविध विषय समित्यांच्या पदाधिकार्यांनी प्रतापगडावर शिवरायांना अभिवादन केले. शिवजयंतीनिमित्ताने काही शिवप्रेमींनी अनेक गडावरुन शिवज्योत आणली होती. पोवई नाका येथील शिवतिर्थावर खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सातारा येथील पालिकेत नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, सर्व विषयांचे सभापती तसेच नगरसेवक व कर्मचार्यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आले.