
दैनिक स्थैर्य । दि.०१ एप्रिल २०२२ । लोणंद । लोणंद नगरपंचायतीत स्वच्छ सर्वेक्षण योजनेत लाखो रूपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत लोणंद शिवसेनेच्या वतीने आज सकाळी दहा वाजता नगरपंचायतीवर हंडा मोर्चा काढण्यात आला.
नगरपंचायतीच्या हद्दीतील कचरा उचलण्यासाठी सात घंटागाड्यांचे टेंडर असताना प्रत्यक्षात मात्र तीन किंवा चार घंटागाड्यांच्या मार्फत कचरा उचलला जातोय तसेच लोणंद मधे सध्या सुरू असलेल्या विकासकामांच्या निकृष्ट दर्जाबाबत तक्रार करूनही दखल घेतली जात नाही ,लोणंद नगरपंचायतीत स्वच्छ सर्वेक्षणच्या योजनेत लाखोंचा भ्रष्टाचार झाला असून त्याची सखोल चौकशी व्हावी तसेच आंबेडकर नगर झोपडपट्टीतील नागरिकांना वारंवार नागरी सुविधांची मागणी करूनही त्या पुरविण्यात येत नसल्याबद्दल तसेच तसेच शहरातील सार्वजनिक शौचालयांची दूरावस्था झालेली असुनही दुरूस्तीच्या नावे बोगस ठेकेदारांच्या मार्फत बीलं काढली जात असल्याचे आरोप यावेळी लोणंद शहर शिवसेनेकडून करण्यात आले.
आज शिवसेच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चाचे नेतृत्व शहराध्यक्ष तथा बाजार समिती संचालक विश्वास शिरतोडे यांनी केले. मोर्चाची सुरवात अहिल्यादेवी स्मारकाला अभिवादन करून करण्यात आली. सदर मोर्चा अहिल्यादेवी चौक ते लोणंद निरा रोड , शास्त्री चौक, गांधी चौक, तानाजी चौक लक्ष्मी रोड मार्गे लोणंद नगरपंचायत पटांगणावर आला. यावेळी शिवसेनेच्या अनेक मान्यवरांची भाषणं झाल्यानंतर माजी नगरसेविका कुसूम शिरतोडे यांच्या हस्ते नगरपंचायतीचे कार्यालय अधीक्षक शंकरराव शेळके-पाटील यांना निवेदन देण्यात आले. तसेच दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
या मोर्चात विश्वासराव शिरतोडे माजी उपजिल्हाप्रमुख प्रदिप माने, संजय जाधव, शिवसेनेचे जेष्ठ नेते लक्ष्मणराव जाधव, महंमदशेठ कच्ची ,संतोष मुसळे, गणेश पवार, मंगेश खंडागळे,दत्तात्रय ठोंबरे, गणेश जाधव , नाना जाधव आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने महिला व पुरुष सहभागी झाले होते.