स्थैर्य, औरंगाबाद, दि.५: राज्यात शहर नामांतराच्या मुद्द्यावरून आता राजकीय शिमगा सुरू झाला आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ नामकरण करण्याचा मुद्दा पेटला असताना आता त्यात पुणे, अहमदनगर आणि उस्मानाबादच्या नामांतराची भर पडली आहे. अहमदनगरचे नामांतर ‘अंबिकानगर’ करण्याची मागणी शिर्डीचे शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांनी केली आहे, तर संभाजी ब्रिगेडने पुणे शहराचे नामांतर जिजापूर करण्याची मागणी केली. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मात्र औरंगाबादऐवजी पुणे जिल्ह्याचे नाव बदलून ‘संभाजीनगर’ करण्याची नवी टूम सोडली आहे.
महाविकास आघाडीत शिवसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपने औरंगाबादचे नामांतर करण्याची मागणी रेटली आहे. औरंगाबाद महापालिकेत भाजपची सत्ता येताच पहिल्या बैठकीत नामांतराचा ठराव मंजूर करण्यात येईल, असे सांगून उस्मानाबाद, अहमदनगर, औरंगाबादची नावे बदलणे अस्मितेचा प्रश्न आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पाच वर्षे राज्यात भाजप सरकारच्या काळात नामांतर का झाले नाही, असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे.
नामांतराच्या मुद्द्यावरून आघाडीत तंटा निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न
औरंगजेबाचे नाव काँग्रेस -राष्ट्रवादीला पटते का?
औरंगजेबाने आक्रमण करून लाेकांच्या भावना दुखावल्या आहेत. औरंगजेबाच्या नावावरून औरंगाबाद शहरास संबाेधणे आम्हाला न पटणारे आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला ते पटत असेल तर त्यांनी तसे जाहीर करावे, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.
नामांतरास काँग्रेससह आठवले यांचाही विरोध
औरंगाबादच्या नामांतरास काँग्रेसचा विरोध आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली होती. त्याचप्रमाणे रिपाइं अध्यक्ष व मोदी सरकारमध्ये राज्यमंत्री असलेल्या रामदास आठवले यांनीही नामांतरास विरोध केला आहे.
आघाडीच्या अजेंड्यामध्ये प्रस्ताव नाही : नवाब मलिक
राष्ट्रवादी काँग्रेसचा नामांतरास विरोध कायम आहे. महाविकास आघाडी सरकारच्या अजेंड्यात नामांतराचा प्रस्ताव नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केली आहे.
पुण्याचे नाव संभाजीनगर करा : अॅड. आंबेडकर यांचा सल्ला
औरंगाबाद आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा तसा संबंध नाही. छत्रपती संभाजीराजेंना पुणे जिल्ह्यात ठार करण्यात आले. त्यामुळे पुणे जिल्ह्यास संभाजीनगर असे नाव द्या, असा सल्ला वंचितचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.
पुण्याचे नाव जिजापूर करा
बेचिराख झालेल्या ‘पुणे’ला राष्ट्रमाता जिजाऊंनी वसवले. त्यामुळे पुण्याचे ‘जिजापूर’ असे नामांतर करा, अशी मागणी महाराष्ट्र संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केली आहे.
महाराष्ट्राचे नाव छत्रपती शिवाजी महाराष्ट्र करा : अबू आझमी
नामांतर करायचेच आहे तर राज्याचे करा. छत्रपती शिवाजी महाराष्ट्र असे नामांतर करा, अशी भूमिका समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबू आझमी यांनी स्पष्ट केली. नाव बदलून विकास होत नाही, असे सांगून आैरंगाबादच्या नामांतरास सपाचा विरोध असल्याचे त्यांनी जाहीर केले.
इकडे आड अन॰ तिकडे विहीर
महाविकास आघाडी सरकारने मध्यंतरी राज्यातील काही लाख वस्त्यांची व गावांची जातिवाचक नावे बदलण्याचा निर्णय एका फटक्यात घेतला. औरंगाबादच्या नामांतराचा प्रश्न शिवसेनेची काेंडी करणारा ठरतो आहे. शहरांची नावे बदलण्याचा प्रस्ताव शिवसेनेने रेटल्यास काँग्रेस सरकारचा पाठिंबा काढून घेऊ शकते. त्यामुळे शिवसेनेसाठी इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती आहे. औरंगाबाद मनपा हद्दीत २०११ च्या जनगणनेनुसार ५१.७५ टक्के हिंदू, ३०.७९ टक्के मुस्लिम, १५.१७ टक्के बौद्ध, १.६२ टक्के जैन व इतर धर्मीय लोकसंख्या आहे
औरंगाबादचे नामांतर पूर्वीच झाले आहे : संजय राऊत
औरंगाबादचे नामांतर पूर्वी झाले आहे. आता फक्त औपचारिकता राहिली आहे. ही औपचारिकता फडणवीस सरकारच्या काळात का झाली नाही, असे शिवसेना नेते संजय राऊत सोमवारी म्हणाले. छोट्या पक्षांनी मात्र नामांतरास विरोध दर्शवला आहे.
प्रत्येकाचे गणित वेगवेगळे : १. हिंदुत्व सोडलेले नाही हे सिद्ध करण्यासाठी शिवसेनेचा आटापिटा चालू आहे. २. काँग्रेसला राज्यातील मुस्लिम व्होट बँक गमावण्याची भीती आहे. ३. काँग्रेसची व्होट बँक संपवण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला रस आहे. ४. शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याचे भाजपला जनतेला दाखवून द्यायचे आहे.