दैनिक स्थैर्य । दि. २५ एप्रिल २०२२ । मुंबई । मुंबईत शिवसेना नेत्यांनी सुरू केलेल्या गुंडगिरीकडे पोलीस यंत्रणा दुर्लक्ष करीत आहे. सरकारी यंत्रणेचा आशीर्वाद असल्याने शिवसेनेचे कार्यकर्ते भाजपा नेत्यांवर, कार्यकर्त्यांवर हल्ले करीत आहेत, असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शनिवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपा प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.
श्री.राणे म्हणाले की, शिवसेनेच्या महापालिकेच्या कारभाराचा पंचनामा करणाऱ्या भाजपातर्फे काढण्यात आलेल्या पोलखोल यात्रेवर हल्ले करण्यात आले. मोहित कंभोज यांच्या वाहनावरही हल्ला करण्यात आला. या गुंडगिरीच्या घटनांकडे पोलीस यंत्रणा दुर्लक्ष करीत आहे. आ.रवी राणा, खा.नवनीत राणा यांच्या घरावरही शिवसेनेचे कार्यकर्ते चालून गेले.
खा.संजय राऊत, राज्याचे मंत्री अनिल परब हे राणा दाम्पत्याला जाहीरपणे धमक्या देत आहेत. मात्र त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत पोलीस यंत्रणा दाखवत नाही. शरद पवार यांच्या घराबाहेर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर तातडीने कारवाई केली गेली. मात्र राणा दाम्पत्याला धमक्या देणाऱ्या, त्यांच्या घराबाहेर गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांवर मात्र कारवाई केली जात नाही, असेही श्री.राणे यांनी नमूद केले.