स्थैर्य, सातारा, दि.२१: महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचा योग्य समन्वय सातारा जिल्ह्यात आहे. पदवीधर मतदार संघ आणि शिक्षक मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्याचे पूर्ण नियोजन करण्यात आले आहे. या यशामध्ये शिवसेना आपला वाटा ताकतीने उचलेल, अशी ग्वाही गृहराज्य मंत्री शंभुराज देसाई यांनी दिली.
पुणे पदवीधर मतदार संघातून अरुण लाड आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार जयंत आसगावकर या महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारसंदर्भात शिवसेनेच्या वतीने नियोजन बैठकीचे आयोजन मोळाचा ओढा, सातारा येथील भगवतेसाई मंगल कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी गृहराज्य मंत्री शंभुराज देसाई मार्गदर्शन करत होते. याप्रसंगी शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे-पाटील, माजी आमदार सदाशिव सपकाळ, धैर्यशील कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी शंभुराज देसाई म्हणाले, अतिशय बारकाईने नियोजन केले आहे. तालुकानिहाय शिवसेनेचे 2, युवा सेनेचा एक आणि महिला आघाडी 1 अशी पाच लोकांची तालुकानिहाय समिती करण्यात येणार आहे. अशा प्रकारे संपूर्ण मतदार संघाचे नियोजन केले आहे. याद्या प्राप्त करून घेणे, त्या याद्यानुसार मतदारांपर्यंत पोहोचणं, तसेच शहरी भागासाठी स्वतंत्र्य समिती नेमणे आदी नियोजन केले आहे. शिवसेना पूर्ण ताकदीने कामाला लागली आहे.
शिवसेनेचे आमदार महेश शिंदे आणि शेखर गोरे यांच्या अनुपस्थितीबबात प्रश्न उपस्थित केले असता महेश शिंदे हे मुंबईला गेले आहेत तर शेखर गोरे हे आजारी आहेत. त्या सर्वांशी बोलणे झाले आहेत. शिवसेनेत कोणताही बेबनाव नाही. आ. महेश शिंदे आल्यानंतर स्वतः कोरेगाव मतदार संघात नियोजन करणार असल्याचे ना. देसाई यांनी सांगितले आहे.
महाविकास आघाडीतर्फे विधान परिषदेतील बारा जागांबाबत विचारणा केली असता राज्य सरकारने आपल्या अधिकारानुसार मंत्रीमंडळाचा प्रस्ताव राज्यपाल महोदयांकडे पाठवला आहे. लवकरच राज्यपाल मंत्रीमंडळाची शिफारस स्विकारतील. विरोधक सत्तेत असताना आम्ही कधीही असा विरोध केला नाही, हे विरोधकांनी लक्षात घ्यावे, असे ना. देसाई म्हणाले.
आ. पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर विभागाच्या नोटीस आल्याबाबत छेडले असता केंद्र सरकार त्यांच्या अधिकाराचा वापर करत आहे. तथापि, आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी लवकरच नोटिसीला उत्तर देईन, असे स्पष्ट केले आहे. योग्य-अयोग्य येणारा काळच ठरवेल.
तसेच वाढीव विज बिलाबात ना. देसाई म्हणाले की, सध्या विद्युत मंडळाची आर्थिक स्थिती बिकट आहे. सध्या जी थकबाकी आहे, त्यात मोठी थकबाकी भाजप सरकारच्या काळातील आहे. त्याची चौकशीही लवकरच राज्य सरकार करेल.
नितीन बानुगडे-पाटील म्हणाले, राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचे महाविकास आघाडी सरकार आहे. या सरकारचे नेतृत्व शिवसेना करत आहे. या सरकारला ठाकरे सरकार असे म्हटलं जात आहे. यामुळे उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे यापेक्षा महाविकास आघाडीचा आहे, हे लक्षात ठेवून पक्षाचा आदेश पाळून शिवसैनिक काम करतील.