फलटण पंचायत समिती कार्यालयास शिवसेना टाळे ठोकणार : तालुका प्रमुख प्रदिप झणझणे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०८ सप्टेंबर २०२२ । फलटण । झणझणे सासवड येथील वाघेश्वरी मंदिरानजीकचा रस्ता पिण्याच्या पाण्यासाठी पाईपलाईनच्या कारणास्तव प्रशासनाने ऐन पावसाळ्यात खोदकाम केले. सदर पाणी साठा करण्यासाठी लागणारी टाकी देखील अजुन अस्तित्वात नाही. सदर योजनेस दोन वर्षे कालावधी देखील शिल्लक होता. असे असतानाही सदर काम खरेतर उन्हाळ्यात करणे अपेक्षित होते. मुळातच आत्तापर्यंत कधीही डांबरीकरण व खडीकरण न झालेला हा रस्ता आहे. खोदकाम केल्यानंतर तर खुप मोठ्या प्रमाणावर निघालेली माती त्याच रस्त्यावर टाकण्यात आली. सध्या पाऊस दररोज मोठ्या प्रमाणावर पडत असल्याने पुर्णपणे चिखलमय रस्त्याचे साम्राज्य तयार झाले आहे. त्यामुळे वाहने अर्धा चिखलात अडकत आहेत. दुध घालण्यासाठी शेतक-यांची अडचण होत आहे. अपघात होत आहेत. अशा परिस्थितीत रस्ता खोदल्यापासुन अंदाजे पंधरा दिवसांपासून सदर रस्ता मुरुम टाकुन व त्यावर रोलर फिरवुन पुर्ववत करुन द्यावा अशी तेथील राहणा-या व वाहतुक करणा-या ग्रामस्थांच्यावतीने मागणी केली होती. परंतु त्यास निद्रिस्त प्रशासनाने कोणताही प्रतिसाद दिला नसल्याचे शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी फलटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी अमिता गावडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

सदर रस्ता पुर्ववत करण्यासाठी मागील पंधरा दिवसांपासून गटविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक यांचेशी सातत्याने संवाद साधुन व पाठपुरावा करुनही कोणताच सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. तसेच तत्पूर्वी सदर खोदकामासाठी पाण्याचा साठा करणारी टाकी अस्तित्वात नसताना व सदर कामासाठी दोन वर्षे अवधी शिल्लक असताना ऐन पावसाळ्यात खोदकाम करण्याची परवानगी कोणी दिली याची चौकशी लावण्यात यावी अशी मागणी केली आहे. तसेच सदर रस्त्यावर येत्या आठ दिवसात मुरुम टाकुन व रोलर फिरवुन रस्ता पुर्ववत करुन द्यावा अशी मागणी फलटण तालुका शिवसेनेच्यावतीने तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

येत्या आठ दिवसात रस्ता पुर्ववत न झाल्यास नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी फलटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी या प्रशासन हाताळण्यास व फलटण तालुक्यातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुर्णपणे अकार्यक्षम आहेत अशी खात्री झाल्यानंतर फलटण पंचायत समिती कार्यालयास फलटण तालुका शिवसेनेच्यावतीने शिवसेना स्टाईलने टाळे ठोको आंदोलन करणार असल्याचा आक्रमक ईशारा शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी दिलेला आहे. तसेच आंदोलनवेळी कायदा व सुव्यवस्थेची समस्या निर्माण झाल्यास याची संपुर्ण जबाबदारी फलटण तालुका प्रशासनाची असेल असे निवदेनात स्पष्ट सांगितले आहे. सदर निवेदनाच्या प्रती सातारा जिल्हाधिकारी, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आलेल्या आहेत.

सदर निवेदन देताना शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे, ग्राहक संरक्षण कक्षाचे माजी जिल्हाप्रमुख शैलेंद्र नलवडे, ग्राहक संरक्षण कक्षाचे उप शहर प्रमुख भारतशेठ लोहाना, झिरपवाडी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या रेखा नवनाथ गुंजवटे, माथाडी कामगार तालुका प्रमुख नंदकुमार काकडे, मलठण शाखाप्रमुख अक्षय तावरे, सोमंथळी शाखाप्रमुख शिवाजी सोडमिसे, वैभव अनपट, राजाभाऊ इप्ते, रामचंद्र गुंजवटे आदी शिवसैनिक उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!