स्थैर्य, मुंबई, दि.३: भाजपचे युवा नेते आणि आमदार नितेश राणे आणि शिवसेना यांच्यात नेहमीच संघर्ष होत असतो. नितेश राणे सातत्याने शिवसेनेच्या पक्षनेतृत्वावर टीका करतात, तर शिवसेनेचे नेते त्यांना प्रत्युत्तर देण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात. मध्यंतरीच्या कोरोना काळात कोकणातील परंतू मुंबईत राहणा-या लोकांवरूनही राजकारण रंगले होते. आता पुन्हा कोरोनावरून टोलेबाजी रंगली आहे. निमित्त ठरले ते म्हणजे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत!
महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार सिंधुदुर्गच्या दौ-यावर होते. यावेळी एका बैठकीत त्यांच्यासोबत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत देखील होते. महत्वाचे म्हणजे दोघांनीही मास्क घातले होते. सत्तार बोलत असताना बाजुला बसलेल्या विनायक राऊतांना शिंक आली. तोंडा, नाकावाटे कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून नागरिक मास्क घालतात. मात्र, राऊत यांनी शिंक येताच नेहमीच्या सवयीप्रमाणे हात समोर धरला. यावेळी त्यांनी एकच चूक केली, शिंक येताना त्यांनी मास्क काढला आणि नाका-तोंडासमोर हात धरला व पुन्हा मास्क घातला.
नेमका हाच व्हीडिओ आमदार नितेश राणे यांनी पोस्ट करत निशाणा साधला आहे. ‘हे रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार! एकदा त्यांना विचारा त्यांनी मास्क का घातला आहे? अशा मुर्खांपासून माझ्या कोकणाला आता देवानेच वाचवावे’ असा सणसणीत टोला लगावला आहे.