
दैनिक स्थैर्य | दि. २७ फेब्रुवारी २०२५ | फलटण |
पुण्यातील स्वारगेट बसस्थानकामध्ये उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचाराची घटना घडली. या बसस्थानकात ही घटना घडल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. घटनेचे तीव्र पडसाद देखील उमटले. या घटनेची माहिती मिळताच शिवसेना नेते वसंत मोरे स्वारगेट बस स्थानकात दाखल झाले. त्यावेळी त्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्वारगेट बस स्थानक परिसरातील सुरक्षा कार्यालयाची तोडफोड केली.
वसंत मोरे यांनी स्वारगेट बसस्थानकात खराब एसटी बसेसमध्ये गैरप्रकार होत असल्याचं समोर आणत तीव्र आंदोलन केले.
अत्याचाराचे प्रकरण समोर येताच वसंत मोरे शिवसैनिकांसह स्वारगेट स्थानकात पोहचले आणि सुरक्षा केबिनची तोडफोड केली. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, तिकडे चार बस उभ्या आहेत. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात कंडोमची पाकिटे पडलेली आहेत. याचा अर्थ काय घ्यावा. इथे जो प्रकार घडला आहे, तो दररोज होत असल्याचं दिसून येत आहे. यामध्ये येथील कर्मचार्यांचा हात आहे. जर या ठिकाणी सुरक्षा कर्मचारी आहेत तर मग हे सुरक्षा कर्मचारी नेमकं काय करत आहेत? येथे असणारे कर्मचारी केबिन उघडायला आहेत का? असा संतप्त सवाल शिवसेनेचे नेते वसंत मोरे यांनी केला. यानंतर एकच खळबळ उडाली.