स्थैर्य, मुंबई, दि.१०: अभिनेत्री कंगना रनोटने टीका करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला. यानंतर राज्य सरकारमधील मंत्र्यांपासून सर्वसामान्यांनी कंगनाबद्दल आपली नाराजी व्यक्त केली. अशात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीही प्रतिक्रिया देत विरोधी पक्षावर टीका केली आहे.
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना कोणी त्यांचा एकेरी उल्लेख केला असता, तर तेही चालवून घेतले नसते, असे जयंत पाटील म्हणाले. पाटील म्हणाले की, कंगनाच्या मुद्द्यावर विरोधी पक्षाने महाराष्ट्राच्या बाजूने बोलायला हवे, मात्र भाजप नेते तसे करत नाहीत. कोण कुणाला मुद्दामहून समर्थन देतंय, हे महाराष्ट्राच्या लक्षात येत आहे. कंगनाचा बोलवता आणि करवता धनी कोण आहे, हे दिसत आहे. तिच्या मागे कोणता पक्ष आहे, हे आता स्पष्ट झाले आहे, अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली.
… तर प्रसारमाध्यमांनी दुर्लक्ष करावे
राज्यातील प्रमुखांबाबत अशी भाषा वापरणे हे जनतेला मान्य आणि सहन होणार नाही. एखाद्याने प्रसिद्धीसाठी विधाने केली, तर प्रसारमाध्यमांनी दुर्लक्ष करावे, कशाला किती महत्त्व द्यायचे? याला काही मर्यादा आहेत, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. कंगनाच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईला बीएमसी उत्तर देईल. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी या प्रकरणावरून नाराज आहेत, हे तुम्ही सांगितल्यावर समजलं. माझ्या माहितीत असे आलेले नाही, असेही ते म्हणाले.