स्थैर्य, मुंबई, दि.१२: महाराष्ट्रामधील विधानसभा निवडणुकीत भाजप एक नंबरचा पक्ष होता व शिवसेना दुसऱ्या नंबरवर होती, तरीही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला मग तेव्हा महाराष्ट्रातील जनतेचा अपमान झाला नाही का? शिवसेना व भाजपची युती असताना कमी संख्या असूनही महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होतो, तेव्हा तो जनतेचा अपमान ठरत नाही का?, असा प्रतिसवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. नितीशकुमार यांचा पक्ष तिसऱ्या नंबरवर असतानाही ते मुख्यमंत्री होणार असतील तर तिथल्या जनादेशाचा अपमान झाला असे बोलणारे शिवसेनेचे खासदार संजय राउत व शिवसेना यांची भूमिका दुटप्पी आणि सोयीची असल्याची टिकाही प्रवीण दरेकर यांनी केली.
बिहारबाबत शिवसेना नेते आणि शिवसेनेचे मुखपत्र आपली भूमिका सतत बदलत आहे.
नितीशकुमार यांना बिहारचे मुख्यमंत्री केले तर त्याचे सारे श्रेय शिवसेनेला
जाईल, असे निकालादिवशी संजय राऊत म्हणाले होते आणि आज मात्र त्याच्या उलट
भूमिका घेण्यात आली आहे. नितीशकुमार यांना मुख्यमंत्री केले तर तिथल्या
जनतेचा, जनाधाराचा अपमान होईल, असे आता सामनातून म्हटले गेले आहे, असे नमूद
करत शिवसेनेची ही भूमिका दुतोंडी नाही काय?, असा सवाल दरेकर यांनी उपस्थित
केला.