
दैनिक स्थैर्य । 17 जुलै 2025 । सातारा । गेले तीन महिने पाण्याअभावी बंद असलेली कोयनेच्या शिवसागर जलाशयात तापोळा येथून कार्यरत असणारी शिवप्रताप तराफा सेवा नुकतीच सुरू करण्यात आली आहे. या सेवेमुळे कोयनेच्या जलाशयातील दळणवळण सुलभहोऊन लोकांची गैरसोय दूर होणार आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील कोयना, सोळशी व कांदाटी खोर्यातील जनतेला दळणवळण सोयीसाठी उपलब्ध असलेली सातारा जिल्हा परिषदेची तराफा (बार्ज) सेवा अत्यंत महत्त्वाची आहे. हा तराफा तापोळा येथून सोळशी नदीवर जावळी तालुक्यातील केळघर (सोळशी) या गावापर्यंत व कोयना नदीवर महाबळेश्वर तालुक्यातील गाढवली या गावादरम्यान तराफा सेवेप्रमाणेच कोयनेच्या दुर्गम कांदाटी, सोळशी व कोयना विभागातील जनतेच्या दळणवळणासाठी जिल्हा परिषदेमार्फत बोट (लाँच) सेवाही उपलब्ध आहे; परंतु मे महिन्यात पाणी कमी झाल्यानंतर ती बंद करण्यात आली. दरवर्षी ती 15 ऑगस्टनंतरच सुरू होते; पण यावर्षी पाऊस समाधानकारक पडल्याने पाणी पातळी वेगाने वाढली असून, वातावरण अनुकूल झाल्यास ही बोट सेवाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे.यामुळे कोकणात व सातार्याकडे जाणारी वाहतूक पुन्हा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
या सेवेचा प्रारंभ सरपंच व शिवसेना संघटक गणेश उतेकर, युवा सेना तालुकाध्यक्ष अजित सपकाळ, शिवसेना वैद्यकीय कक्ष तालुका प्रमुखआनंद धनावडे, युवा नेते सचिन कदम, लाखवडचे सरपंच मंगेश संकपाळ, शिवसेना विभागप्रमुख किरण शिंदे, शाखाप्रमुख रूपेश शिंदे, कर्मचारी संतोष पवार आदींसह अधिकारी व नागरिक उपस्थित होते
दरवर्षी पावसाळ्यात ही सेवा ऑगस्टमध्ये सुरू करण्यात येते. मात्र, यावर्षी दमदार पावसाने नदी पातळी चांगलीच वाढल्याने यंदा उपमुख्यमंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख,रणजित भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही सेवा सुरू करण्यात आली आहे.