
पुनर्वसन गोळेगाव (फलटण) येथे छत्रपती शिवाजी महाराजांची ३९६ वी जयंती मोठ्या उत्साहात. किल्ले पुरंदरवरून शिवज्योत, सांस्कृतिक कार्यक्रमांना दाद.
स्थैर्य, फलटण, दि. १९ फेब्रुवारी : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त फलटण तालुक्यातील पुनर्वसन गोळेगाव येथे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून फलटण शहर पोलीस स्टेशन येथील पोलीस उपनिरीक्षक दिनेश शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थित शिवप्रेमी, ग्रामस्थ व महिला मंडळाने घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला.
पद्मावती नवतरूण क्रिडा मंडळ, गोळेगाव येथील तरुणांनी किल्ले पुरंदरवरून शिवज्योत आणत गोळेगावपर्यंतचा प्रवास पूर्ण केला. या शिवज्योतीच्या स्वागतासाठी गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोळेगाव येथील शिक्षक व विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थितांनी दाद दिली. देशभक्तीपर गीत, पोवाडे व शिवचरित्रावर आधारित नाट्यप्रयोगांनी वातावरण भारावून गेले.
पोलीस उपनिरीक्षक दिनेश शिंदे यांनी शिवरायांच्या संपूर्ण चरित्रावर प्रकाश टाकत मुलांवर चांगले संस्कार करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. “शिवरायांचे धैर्य, शिस्त आणि स्वराज्याची भावना प्रत्येक तरुणाने आत्मसात करावी,” असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे स्वागत सचिन शेगर, सौ. प्रतीक्षा गोळे, गौरी गोळे, सुनीता सपकाळ यांनी केले तर आभार आकाश गोळे, रवींद्र गोळे व मुख्याध्यापिका गायकवाड मॅडम यांनी मानले.
गावातील सर्व ग्रामस्थ, महिला मंडळ व तरुण वर्गाच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली आणि गोळेगाव खऱ्या अर्थाने शिवमय झाले.
