शिरवळ ते लोणंद आणि लोणंद ते सातारा रस्त्याचे चौपदरीकरण : केंद्र सरकारकडून 437 कोटी रुपयांचा निधी मंजूर

खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रयत्नांना यश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 08 फेब्रुवारी 2025 | फलटण | शिरवळ, लोणंद आणि सातारा परिसरातील नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. शिरवळ ते लोणंद आणि लोणंद ते सातारा या एकूण 72 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी 437 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, असे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी जाहीर केले आहे.

या प्रकल्पात शिरवळ ते लोणंद आणि लोणंद ते सातारा या मार्गावर पेव्हड शोल्डर (पक्का खांदा) पध्दतीच्या रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या रस्त्याच्या कामाचा प्रारंभ होणार आहे. नव्याने तयार होणार्‍या या रस्त्यामुळे शिरवळ, लोणंद, वाठार इत्यादी परिसरात जलद, सुरक्षित आणि दर्जेदार वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहे.

या रस्त्यावर 13 आणि 19 अशा एकूण 32 पुलांची पुर्नबांधणी करण्यात येणार आहे. तसेच, 7 नवे जंक्शन्स (रस्ते एकत्र येण्याचे ठिकाण) तयार करण्यात येणार आहेत. लोणंद-सातारा मार्गावर 3 नवे पूल उभारण्यात येणार आहेत, तर शिरवळ ते सातारा व्हाया लोणंद या मार्गावर एकूण 131 कल्व्हर्टस बांधण्यात येणार आहेत. रेल्वे किंवा रस्ता खालून पाण्याचा पाट किंवा नळ, भूमिगत नाले यांसारख्या व्यवस्थेला कल्व्हर्टस असे संबोधले जाईल.

पुणे-बेंगलोर महामार्गावरील प्रचंड वाहतूक असल्यामुळे शिरवळ ते लोणंद आणि लोणंद ते सातारा या रस्त्यावरुन टोल वाचवण्यासाठी वाहनांची वर्दळ खूपच वाढली आहे. या रस्त्यावरुन केलेल्या निरिक्षणात दररोज शिरवळ-लोणंद मार्गावर 9543 वाहने तर लोणंद-सातारा मार्गावर 11,175 वाहनांची वाहतूक होत आहे. पावसाळ्यात ब-यापैकी पर्जन्यमान असल्यामुळे या मार्गाची दर्जोन्नती करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला गेला आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितिन गडकरी यांच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाव्दारे हा निधी मंजूर करण्यात आला आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय मंत्री ना. नितिन गडकरी यांना देखील भेटले होते आणि या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.

या प्रकल्पामुळे शिरवळ, लोणंद आणि सातारा परिसरातील नागरिकांना जलद आणि सुरक्षित वाहतूक सुविधा मिळणार आहे. गतीमान विकास साधण्याच्या प्रयत्नांमध्ये हा एक महत्त्वपूर्ण भर आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी नमूद केले आहे की प्रत्यक्ष काम सुरु होऊन पूर्ण करण्याकडे सातत्याने प्रयत्न राहणार आहेत.


Back to top button
Don`t copy text!