वीर धरण परिसरात प्रेमी युगुलांना लुटणारी टोळी जेरबंद, शिरवळ पोलिसांची कामगिरी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. ०८: शिरवळ वीर धरण परिसरामध्ये प्रेमीयुगल व पर्यटनासाठी नीरा नदीच्या किनारी फिरायला आलेल्या नागरिकांना शस्त्रांचा धाक दाखवुन लुटमार करणार्‍या आंतरजिल्हा टोळीतील सहाजणांना शिरवळ पोलिसांनी थरारक पाठलाग करत जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.

याबाबत माहिती अशी, वीर धरण परिसरात शिरवळ पोलीस गस्त घालत होते. यावेळी असताना नंबर प्लेट नसणार्‍या दुचाकीवर वावरणार्‍या युवकांना पोलिसांनी हटकले असता संबधितांनी पळ काढला. शिरवळ पोलीसांनी पाठलाग करत महावीर सुखदेव खोमणे वय 23, रा. चंद्रपुरी, ता. माळशिरस, शाहरुख महमूलाल बक्षी वय 24 , मुळ रा. मार्डी, ता. माण सध्या रा. चंद्रपुरी, ता. माळशिरस, भैय्या हुसेन शेख वय 25, रा. कांबळेश्‍वर, ता. बारामती व 17 वर्षीय अल्पवयीन युवक अशा चौघांना ताब्यात घेतले तर दोनजण अंधाराचा फायदा घेवून पसार झाले.

दरम्यान, पसार झालेल्या अमीर मौल्लाली मुल्ला वय 21, रा. चंद्रपुरी, ता. माळशिरस व मयुर अंकुश कारंडे वय 20, रा. तावशी, ता. इंदापूर पुणे यांना लोणंदजवळ फलटण उपविभागाचे पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी ताब्यात घेत शिरवळ पोलीसांच्या स्वाधिन केले. संशयितांकडून कुकरी, मोबाईल, दोन दुचाकी, धारदार शस्त्रे असा एकुण 1 लाख 56 हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेत जप्त केला आहे.

तपासादरम्यान या टोळीने वीर धरण परिसरामध्ये मित्रांसमवेत फिरायला गेलेल्या भोर येथील युवकांना शस्त्राचा धाक दाखवत दरोडा टाकत रोख रक्कम 10 हजारांची रक्कम, मोबाईल हॅण्डसेट असा ऐवज लुटल्याचे समोर आले आहे. या दरोड्यातील 3 हजार 500 रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे पुढील तपास करीत आहेत.

टोळीवर अनेक गुन्हे दाखल
टोळी प्रमुख महावीर खोमणे याचेवर दहिवडी पोलीस ठाणे येथे ए.टी.एम. फोडुन चोरुन नेण्याचा प्रयत्न, नातेपुते येथे दरोडा, वालचंदनगर येथे जबरी चोरी यासारखे इतरांवर विविध पोलीस ठाण्यांतर्गत गुन्हे दाखल आहेत. विना नंबर प्लेटच्या बजाज पल्सर व होडा शाईन कंपनीच्या मोटार सायकलवरुन ट्रिपलशीट येऊन लुटमार करणार्‍या टोळीकडुन अशा प्रकारचे गुन्हे घडले असल्यास संबधितांनी आपले हद्दीतील पोलीस ठाण्याशी संपर्क साधुन न घाबरता संबधितांविरुद्ध तक्रार नोंदवावी, असे आवाहन शिरवळ पोलीस ठाणे मार्फत करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!