श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालयात शिवजयंती सोहळा उत्साहात

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २० फेब्रुवारी २०२३ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण येथे शिवजयंतीचा सोहळा उत्साही वातावरणात साजरा झाला. तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग आणि कलाविष्कारांतील शोभायात्रा, ढोलपथकांचे प्रदर्शन, हलगीचा तालमय वातावरण, श्री शिवप्रताप ऐतिहासिक शस्त्रविद्या सादरीकरण, शिवकालीन नाणी प्रदर्शन, जरीपटक्याचे मिरविणे यामुळे महाविद्यालयाचा परिसर शिवमय झाला. संस्थेचे प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम आणि महाविद्यालयांचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी महाविद्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्यास पुष्प वाहून अभिवादन केले.

श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण येथील विद्यार्थी विद्यार्थिनींसह राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी महाविद्यालय परिसरात ढोल-ताशाच्या निनादात शोभायात्रा काढली. भगवे फेटे, शुभ्रवस्त्रांकित तरुणाईमुळे ही शोभायात्रा लक्षवेधी ठरली. शोभायात्रा महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीसमोर आल्या नंतर विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कारांचे सुमारे दोन तास सादरीकरण केले. यामध्ये ढोलपथकाचे सादरीकरण, जरीपटका नाचविण्याचा उपक्रम, हलगीचा तालमय वातावरण, श्री शिवप्रताप ऐतिहासिक शस्त्रविद्या सादरीकरण यांचा समावेश होता. त्यानंतर संस्थेचे प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम यांच्या हस्ते शिवकालीन नाणी प्रदर्षणाचे उदघाटन करण्यात आले. त्यानंतर सदरील शिवजयंती उत्सवाचे प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रापासून प्रेरणा घेऊन, त्यांनी दाखविलेल्या मार्गावरुन आपल्याला वाटचाल करावयाची आहे याचे भान बाळगून तरुणांनी देशहितासाठी स्वतःस तयार करावे, असे आवाहन उपस्थित विद्यार्थ्यांना केले. यानंतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावरआधारित विचार व्यक्त केले. प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री. राहुल गोफने यांनी विद्यार्थ्यांना सखोल शिवचरित्र व शिवचरित्राची आजच्या काळातील आवश्यकता या विषयावर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना श्री. अरविंद निकम यांनी शिवरायांनी मराठी माणसाचा कणा ताठ करून, त्याला सन्मानाने जगण्याची प्रेरणा दिली आणि त्यांचा आदर्श प्रत्येक तरुण पिढीने घेतला पाहिजे असे उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी समृध्दी कुंजीर व आभार प्रदर्शन कुमार सुजित पवार या विद्यार्थ्याने व्यक्त केले.शिवजयंती उत्सव आयोजित करण्यासाठी महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाने विशेष असे परिश्रम घेतले.


Back to top button
Don`t copy text!