फलटणमध्ये “शायनींग महाराष्ट्र” प्रदर्शन; युवकांनी लाभ घ्यावा : खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १९ मार्च २०२२ । फलटण । स्वराज फाउंडेशन व सांसा फाउंडेशन आयोजित केंद्र शासनाच्या जनजागृती अभियानांतर्गत “शायनिंग महाराष्ट्र” हे भव्य दिव्य असे प्रदर्शन आयोजित केलेले आहे. २५ ते २७ मार्च रोजी सकाळी १० ते सायंकाळी ०५ वाजेपर्यंत फलटण विंचुर्णी रोड वरील शुभारंभ लॉन्स येथे “शायनिंग महाराष्ट्र” हे भव्य दिव्य प्रदर्शन संपन्न होणार आहे. तरी फलटण तालुक्यातील जास्तीत जास्त युवकांनी व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा व केंद्र सरकारच्या योजनांची सविस्तर माहिती घ्यावी, असे आवाहन माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेले आहे.

“शायनिंग महाराष्ट्र” या भव्य दिव्य प्रदर्शनामध्ये विशेष आकर्षण म्हणजे संपूर्ण भारतातून केंद्रीय मंत्रिमंडळातील विविध विभागाचे कॅबिनेट मंत्री, नेते, उद्योगपती, अधिकारीवर्ग, संशोधक, डॉक्टर्स, इंजिनीयर,नामांकित वकील व इतर प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञान, कृषी विभाग, संरक्षण विभाग, अंतराळ विभाग, अक्षय ऊर्जा विभाग व इतर सर्व विभाग, केंद्रीय मंत्रालयातील १०० हून अधिक विभागाचा या प्रदर्शनामध्ये सहभाग असून संशोधन, शेती, उद्योग, व्यवसाय, सेवा यांच्यासह अनेक क्षेत्रातील माहिती मिळवण्यासाठी आवर्जून प्रदर्शनास भेट द्यावी, असेही आवाहन करण्यात आलेले आहे.

खादी आणि ग्रामोद्योग विकास अंतर्गत खादी, दोर, ताग, पर्यावरणस्नेही (इको फ्रेंडली) हातमाग आणि ग्रामीण कारागिरांची हस्तकला यांचाही या प्रदर्शनामध्ये सहभाग असेल,प्रदर्शनात सहभागी सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रश्नोत्तर स्पर्धा (Quize Compitation) आयोजित केली जाणार असून विजयी व सहभागी विद्यार्थ्यांना आकर्षक भेट वस्तू व चषक देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

शाळेचे विद्यार्थी घेऊन येणाऱ्या सर्व शाळा प्रमुखांचा, शिक्षकांचा विशेष भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात येणार आहे,या प्रदर्शनाच्या माध्यमातून माढा लोकसभा मतदारसंघातील सर्व गोरगरीब जनता, शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, महिलावर्ग व ज्येष्ठ मंडळी यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. केंद्र सरकारच्या सर्व योजनांची माहिती या प्रदर्शनामध्ये प्राप्त होणार आहे. तरी आपण या केंद्र शासनाच्या जनजागृती अभियानांतर्गत विविध योजनांची माहिती मिळवण्यासाठी शायनिंग महाराष्ट्र २०२२ च्या भव्य प्रदर्शनाला आवश्य भेट द्यावी. शासनाने नेमून दिलेले कोरोना काळातील सर्व नियम पाळणे बंधनकारक राहतील, सर्वांना सोशल डिस्टंसिंग पाळणे बंधनकारक राहील, आयोजकांकडून मास्क व सॅनिटायझर उपलब्ध करून दिले जातील, असे आयोजकांनी स्पष्ट केलेले आहे.


Back to top button
Don`t copy text!