स्थैर्य, सातारा, दि.२०: पाटण तालुक्यातील डफळवाडी ग्रामस्थांच्या गेल्या 92 वर्षापासून सुरु असलेल्या शेतीच्या पाण्याच्या वहिवाटीस गावातील गुंडांनी विरोध केल्याने डफळवाडी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. पाटण न्यायालयाची निरंतर ताकीद व वहिवाटीच्या विरोधात कराड न्यायालयाने फेटाळलेले अपिल असे असतानाही महसूल व पोलीस यंत्रणा आम्हाला न्याय देईनाशी झाली आहे अशी तक्रार रामचंद्र धुळाराम शिंदे, धुळाराम जगन्नाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली. याप्रकरणी न्याय न मिळाल्यास मंत्रालया समोर आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला.
शिंदे म्हणाले, गावगुंडांनी आमच्या शेतीत येणारे पाणी अडवल्याने आमच्या शेतीचे नुकसान होऊन कुटुंबाची उपासमार होत आहे. डफळवाडी गावठाणात आमचे गेल्या बारा दिवसांपासून उपोषण सुरू आहे. 23 नोव्हेंबर रोजी गावातील काही राजकीय व्यक्तींनी आमच्या कुटुंबातील महिलांना शिविगाळ व मारहाण करून आमच्या पाण्याच्या पाईपांची मोडतोड केली व ते पाणी बेकायदेशीररित्या त्यांच्या शेतात वळवले. पाटण पोलीस स्टेशन व महसूल यंत्रणा राजकीय दबावातून कोणतीही कारवाई करत नाही. तक्रार द्यायला गेल्यावर पोलीसच आम्हाला दमदाटी ची भाषा वापरतात. येत्या आठ दिवसात आम्हाला न्याय न मिळाल्यास आम्ही गृहमंत्र्यांच्या विरोधात मुंबईत मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा धुळाराम जगन्नाथ शिंदे, रामचंद्र धुळाराम शिंदे, पूजा धुळाराम शिंदे, यशोदा बापू शिंदे, उमेश कोंडिबा शिंदे यांनी दिला आहे.