
दैनिक स्थैर्य । दि.१३ फेब्रुवारी २०२१ । मुंबई । अभिनेत्री शिल्पा शेट्टी, बहीण शमिता शेट्टी आणि आई सुनंदा शेट्टी यांच्याविरोधात मुंबईतील अंधेरी कोर्टाने समन्स बजावले आहे. तसेच या तिघींना कोर्टाने २८ फेब्रुवारी रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. एका उद्योजकाने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.
अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा, तिची बहीण शमिता शेट्टी आणि आई सुनंदा शेट्टी यांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. शिल्पा, शमिता आणि सुनंदा यांच्याविरोधात मुंबईतील अंधेरी कोर्टाने समन्स बजावले आहेत. यासह या तिघींना कोर्टाने २८ फेब्रुवारी रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. २१ लाख रुपयांच्या कर्जाचे हे प्रकरण असून, एका उद्योजकाने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
एएनआयच्या ट्विटनुसार, मुंबईतील अंधेरी कोर्टाने अभिनेत्री शिल्पा शेट्टी, तिची बहीण शमिता शेट्टी आणि आई सुनंदा शेट्टी यांना एका उद्योजकाच्या तक्रारीनुसार, समन्स बजावले आहेत. या तिघींनी घेतलेले कर्ज चुकवले नाही, असा आरोप तक्रारदार उद्योजकाने केला आहे. उद्योजकाच्या तक्रारीची दखल घेऊन कोर्टाने तिघींना समन्स बजावून २८ फेब्रुवारी रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
कथितरित्या एका ऑटोमोबाइल एजन्सीच्या मालकाने तिघींविरोधात २१ लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली होती. शिल्पाच्या वडिलांनी त्याच्याकडून २१ लाख रुपये उसने घेतले होते. जानेवारी २०१७ मध्ये व्याजासह घेतलेली रक्कम परत करायची होती. २०१५ मध्ये शिल्पाच्या वडिलांनी हे कर्ज घेतले होते. शिल्पा शेट्टी, शमिता आणि आई सुनंदा या तिघींना हे कर्ज फेडता आले नाही. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, शिल्पाच्या वडिलांनी कर्जासंबंधी शिल्पा, शमिता आणि तिच्या आईला माहिती दिली होती. कर्ज फेडण्याआधीच शिल्पाच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर हे कर्ज फेडण्यास शिल्पा, शमिता आणि सुनंदा यांनी नकार दिला.