दैनिक स्थैर्य । दि. २५ नोव्हेंबर २०२१ । सातारा । सातारा जिल्हा हा शूरवीरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. देशरक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या जवानांमध्ये आपल्या जिल्ह्यातील जवानांची संख्या नेहमीच अधिक राहिली आहे. केवळ युवकच नव्हे तर आता मुलीही सैन्यात भरती होत असून गांजे येथील शिल्पा चिकणे या युवतीने सैन्यात भरती होऊन अनोखा इतिहास घडवला आहे. देशसेवेला समर्पित झालेल्या या भगिनीचा सर्वांनाच सार्थ अभिमान आहे, असे गौरवोद्गार आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काढले.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जिद्द, चिकाटीच्या जोरावर आसाम रायफलमध्ये भरती होऊन जावली तालुक्यातील गांजे गावामध्ये प्रथम महिला सैनिक होण्याचा बहुमान प्राप्त केलेल्या शिल्पा चिकणे यांची भेट घेऊन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी ते बोलत होते. यावेळी गावच्या सरपंच लक्ष्मी चिकणे, रामचंद्र चिकणे, सागर धनावडे, विशाल दळवी, श्याम धनावडे, प्रवीण पाटणे, विक्रांत धनावडे, तुषार धनावडे, प्रफुल्ल शेलार आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
गांजेतील पांडुरंग चिकणे यांची चौथी कन्या असलेल्या शिल्पाने मुलाची कमतरता भरून काढत मुलाच्या तोडीचे काम केले आहे. देशसेवेसाठी नेहमीच युवकांचा पुढाकार राहिला आहे मात्र आता युवतीही युवकांच्या खांद्याला खांदा लावून देशसेवा बजवात असून त्यामध्ये आपला सातारा जिल्हाही मागे नाही हे शिल्पा चिकणे या युवतीने दाखवून दिले आहे. शिल्पा चिकणे यांचा आदर्श जिल्ह्यातील असंख्य युवती घेतील आणि आगामी काळात पुरुषांबरोबरच महिला सैनिकांचा जिल्हा अशी नवी ओळख आपल्या सातारा जिल्ह्याची होईल, असे प्रतिपादन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी केले.