
दैनिक स्थैर्य । दि. २३ जुलै २०२२ । आटपाडी । आटपाडी तालुका साहित्य मंच या व्हॉट्स ॲप ग्रुपतर्फे ८ ऑगस्ट रोजी शुकाचारी येथे शिदोरी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे . आटपाडी तालुक्यातील साहित्यिकांचा नुकताच आटपाडी तालुका साहित्य मंच या नावाने व्हॉट्स ॲप ग्रुप स्थापन करण्यात आला आहे . या ग्रुपमध्ये जुने व नवीन मिळून एकूण ४० साहित्यिक आहेत.
तालुक्यातील सर्व साहित्यिक एकत्र यावेत , जेष्ठ साहित्यिकांचे नव्याने लिहू लागलेल्या साहित्यिकांना / कवींना मार्गदर्शन व्हावे , लिहित्या हातांना बळ मिळावे, तालुक्याची साहित्य परंपरा अधिकाधिक गतीमान व्हावी , तालुक्यातील गावागावांत साहित्याचे वातावरण निर्माण होऊन लोकांचे मनोरंजन व्हावे , मनोरंजनातून प्रबोधन व्हावे, प्रबोधनातून समाज परिवर्तन व्हावे या उद्देशाने आटपाडी तालुका साहित्य मंच निर्माण करण्यात आल्याचे मत जेष्ठ साहित्यीक प्रा . सुनील दबडे यांनी व्यक्त केले आहे.
या मंच मार्फत दोन महिन्यांतून किमान एक साहित्यिक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे . याचाच एक भाग म्हणून या कार्यक्रमाची सुरुवात शुकाचारी या निसर्गरम्य ठिकाणी ८ ऑगस्ट रोजी शिदोरी साहित्य संमेलन घेऊन होणार आहे.
आटपाडी तालुक्यातील सर्व कवी / साहित्यिक ८ ऑगस्ट रोजी आपापली शिदोरी घेऊन या दिवशी शुकाचारी (शुक्राचार्य देवस्थान ) या ठिकाणी येतील . या दिवशी दुपारी १ ते २ वाजेपर्यंत भोजन पार पडेल . दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत कवीसंमेलन गप्पा गोष्टी गाणी इत्यादी साहित्यिक कार्यक्रम संपन्न होईल.
या कार्यक्रमासाठी जेष्ठ साहित्यिक डॉ सयाजीराजे मोकाशी, जेष्ठ कवी प्रा . सुभाष कवडे , जेष्ठ साहित्यिक प्रा विश्वनाथ जाधव , पत्रकार सादिक खाटीक, यांच्यासहीत अनेक मान्यवर संमेलनासाठी उपस्थित राहणार आहेत तरी आटपाडी तालुक्यातील सर्व कवी / साहित्यिक यांनी या शिदोरी साहित्य संमेलनासाठी उपस्थित रहावे असे आवाहन साहित्यिक सुनील दबडे , गझलकार सुधीर इनामदार , कथाकथनकार जीवन सावंत , निवेदक आणि कवी प्रा . श्रीकृष्ण पडळकर यांनी केले आहे.