शेंद्रे ग्रामपंचायतीने कातकरी बांधवांचा घरकुलाचा प्रश्न सोडवला – आ. शिवेंद्रसिंहराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २१ डिसेंबर २०२१ । सातारा । घर पहावे बांधून आणि विहीर पाहावी खोदुन, हि म्हण ग्रामीण भागात प्रचलित आहे. मात्र हि कामे करताना असंख्य अडचणी येत असतात. शेंद्रे येथील २० कातकरी कुटुंबे स्वमालकीची जागा व पक्के घर नसल्याने बिकट अवस्थेत होती. मात्र शेंद्रे ग्रामपंचात आणि ग्रामस्थांनी या बांधवांचे घरकुलाचे स्वप्न सत्यात उतरवून एक आदर्श घडवला आहे, असे गौरवोद्गार आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काढले.
शेंद्रे ता. सातारा येथील २० कातकरी कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजना(ग्रामीण) मधून ९ आणि शबरी आवास योजनेतून ११ अशा एकूण २० घरकुलाचा लाभ देण्यात आला असून या घरकुलांच्या वाटपप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी सातारा उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, सातारा पंचायत समितीच्या सभापती सौ. सरिता इंदलकर, सदस्या सौ. छाया कुंभार, सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, गट विकास अधिकारी सौ. सुदर्शना चव्हाण, अमर मोरे, सरपंच अस्लम मुलाणी, साहेबराव पडवळ , नंदकुमार यादव, चंद्रकांत जाधव ,रघुनाथ जाधव, यशवंत जाधव, विजय पडवळ, विजय पोतेकर, प्रकाश काशिद आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
कातकरी बांधवाना घरकुले उपलब्ध व्हावीत यासाठी सामाजिक कार्यकर्ते अमर मोरे, विजय पोतेकर, प्रकाश काशिद आणि ग्रामस्थांनी विशेष प्रयत्न केले. अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या जेसीबीने जमीन सपाटीकरण, ग्रामपंचायतीने विहीर खुदाई केली. मात्र पाणी अनुपलब्धतेमुळे शेंद्रे येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष पोतेकर, दीपक पोतेकर यांच्याकडून त्यांना दैनंदिन वापरासाठी पाण्याची सुविधा करण्यात आली. अंनत अडचणींवर मात करून कातकरी कुटुंबीयांची घरे उभी राहिली. शेंद्रे ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांचे कार्य आदर्शवत आहे, असे आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.
युवा नेते अमर मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. उपसरपंच सोपान भोसले यांनी सूत्रसंचालन केले. ग्राम विकास अधिकारी गोविंद माने यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास सर्व सदस्य, अजिंक्य पॅनलचे सर्व कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!