दैनिक स्थैर्य । दि. २० डिसेंबर २०२१ । फलटण । चिकाटीने पाठपुरावा करुन अधिकारी आणि आमच्या सहकार्याने खटकेवस्ती सारख्या छोट्या गावात १०० लाभार्थीना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल मिळवून देवून सरपंच बापूराव गावडे यांनी जिल्ह्यात नवीन आदर्श निर्माण केला आहे, हे आदर्श माॅडेल निश्चितच राज्यात दिशादर्शक ठरेल असे प्रतिपादन विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
खटकेवस्ती, ता. फलटण येथे १०० गरीब, गरजू कुटुंबांना पंतप्रधान महाआवास योजनेंतर्गत अभियान टप्पा २ सन २०२१ – २२ मध्ये फलटण पंचायत समिती व खटकेवस्ती ग्रामपंचायत यांचे संयुक्त सहभागाने पंतप्रधान आवास योजना ग्रामीण भूमीपूजन सोहळा व लाभार्थींना भूखंड ७/१२ वाटप, नवीन ग्रामपंचायत कार्यालय इमारत उद्घाटन ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी आ. दीपक चव्हाण होते. यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, जिल्हा बँक संचालक श्रीमंत शिवरुपराजे निंबाळकर खर्डेकर, तहसीलदार समीर यादव, गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे पवार, श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, दूध संघाचे चेअरमन धनंजय पवार, बारामती सहकारी बँकेचे संचालक उद्धव गावडे, श्रीराम बझारचे संचालक महादेव पवार उपस्थित होते.
ना. श्रीमंत रामराजे पुढे म्हणाले, पदाचा उपयोग सर्वसामान्यांसाठी, ज्यांच्यामुळे हे पद मिळाले त्यांच्यासाठी करावा हा आजोबांपासून आमच्या घराण्याचा पांयडा आहे, तो कायम ठेवण्यात मला यश मिळाले, हे यश आज प्रत्यक्षात लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविता आले याचा मनस्वी आनंद झाला आहे.
सरकार कोणत्याही पक्षाचे असो ते योजना आखताना उद्दिष्ट ठेवून आखते, ही योजना मोदींची असली तरी प्रत्यक्षात अंमलबजावणी आघाडी सरकारने केली, महाराष्ट्रात प्रत्यक्षात खटकेवस्ती पर्यंत हे काम आणणे सोपे काम नव्हते, मात्र बापूराव गावडे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नाने १०० कुटुंबांना भूखंडासह हक्काचा निवारा लाभल्याचे पहायला मिळाले याचा मनस्वी आनंद झाल्याचे ना. श्रीमंत रामराजे यांनी स्पष्ट केले.
१९९५ मध्ये धोम – बलकवडी धरणाचे स्वप्न बघितले, ते पूर्णत्वास गेले, श्रीराम सहकारी साखर कारखाना अडचणीत आला तो बाहेर काढून आज सुरळीत सुरु आहे, साखरवाडी कारखाना अडचणीतून बाहेर काढून श्री दत्त इंडियाच्या माध्यमातून उत्तम प्रकारे सुरु केला आहे, चार पदरी रस्ते झाले, कमिन्स आले. फलटण शहरात आणि ग्रामीण भागात वीज, पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण आदी नागरी सुविधांचे मजबुतीकरण आणि त्यांचा विस्तार यशस्वीरीत्या पूर्णत्वास नेवून संबंधितांना न्याय देता आला याचे मोठे समाधान आहे. जे जे योजले ते पंधरा – वीस वर्षात करुन घेतल्याचे सांगत एखादे उद्दिष्ट गाठायचे ठरविले तर त्यासाठी झपाटल्यासारखे कार्यरत राहुन शिपायापासून ते मंत्र्यांच्या सेक्रेटरी पर्यंत गेलो त्यामुळे मला हे यश मिळत गेल्याचे स्पष्ट करीत, तरुण पिढी बद्दल आपली एक तक्रार आहे, त्यांना काय झाले नाही ते लवकर कळते पण ते करुन घ्यायला काय लागते हे कळत नाही ते त्यांनी समजावून घेऊन आगामी काळात विकास प्रक्रियेत सक्रिय सहभागी व्हावे अशी अपेक्षा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली.
आ. दिपक चव्हाण म्हणाले, खटकेवस्ती गावठाणामध्ये शेत मजूर आणि स्थलांतरित मजुरांना पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलांचा उपयोग होणार आहे, फलटण तालुक्यातील ग्रामीण भागात पंतप्रधान आवास योजनेचा आढावा बैठकीमध्ये तालुक्यातील कोणीही लाभार्थी घरकुला पासून वंचित राहू नये अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, फलटण तालुक्यामध्ये साडेसात हजार घरकुलांचे उद्दिष्ट असताना खटकेवस्ती सारख्या छोट्या गावात बापूराव गावडे यांनी १२० घरकुले लाभार्थीना मिळवून दिली आहेत.
आ. दीपक चव्हाण पुढे म्हणाले, श्रीमंत रामराजे यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या वीजेच्या प्रश्नावर वीज मंडळाचे मुख्य अभियंता यांच्या समवेत अन्य अधिकाऱ्यांना बोलावून फलटण पंचायत समिती सभागृहात बैठक घेऊन शेतकऱ्यांचे डीपी बंद करणे, थकित वीज बिल, चुकीची वीज बिल आकारणी आणि साखर कारखान्यांच्या मार्फत वीज बिल वसुली या विषयी सविस्तर चर्चा करुन शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. वीजेच्या सर्व प्रश्नावर अधिकाऱ्यांशी बोलून कसा मार्ग काढता येईल याबाबत सविस्तर चर्चा करुन यावर लवकरच तोडगा काढण्यासाठी अधिकाऱ्यांना गाव पातळीवर बैठका घेण्याच्या सूचना श्रीमंत रामराजे यांनी वीज वितरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले, खटकेवस्ती प्रमाणेच हनुमंतवाडी येथे पंतप्रधान आवास योजनेतून अशाच प्रकारे एकत्रित येऊन सरपंच विक्रम जाधव यांनी विशेष प्रयत्न करुन चांगल्या प्रकारची घरकुल योजना राबविली आहे. आपण जिल्हा परिषद अध्यक्ष असताना खटकेवस्ती येथे घरकुल योजनेसाठी जिल्हा परिषदेची जागा मिळावी असे प्रयत्न सुरु होते त्यामध्ये यश मिळवून आज एकत्रित घरकुल योजना राबवून त्या ठिकाणी लाभार्थ्यांना वीज, पाणी, रस्ते आणि आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करुन देण्याची योजना उपयुक्त आणि प्रेरणादायी आहे. खटकेवस्ती येथे ही योजना प्रत्यक्षात उतरत असताना बापूराव गावडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि ही योजना मंजूर करुन घेतली ती आज पूर्णत्वास जात आहे ही समाधानाची बाब असून बापूराव गावडे यांच्या सरपंच पदाच्या कालावधीमध्ये चांगल्या प्रकारची घरकुल उभारणी होईल अशी अपेक्षा करायला काहीच हरकत नाही.
श्रीमंत संजीवराजे म्हणाले, फलटण पूर्वभाग संपूर्ण बागायती असल्याने मोठ्या शेतकऱ्यांबरोबर शेती कामासाठी महत्त्वाचे योगदान देणाऱ्या शेतमजुरांना योग्य प्रकारे न्याय दिला पाहिजे यासाठी आपण कार्यरत असतो शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत,,,,, ते पोहोचविण्याचे काम बापूराव गावडे आणि त्यांचे सहकारी करतात ही आनंदाची बाब आहे.
जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, तहसीलदार समीर यादव, गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे पवार यांची समयोचित भाषणे झाली. यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ. उषादेवी गावडे, संभाजी निंबाळकर, उपसभापती संजय सोडमिसे, महादेव सकुंडे, प्रहार जनशक्ती संघटनेचे तालुकाध्यक्ष सागर गावडे पाटील, जिल्हा मजूर सहकारी संस्थेचे चेअरमन प्रमोद झांबरे, मार्केट कमिटी संचालक बबनराव खोमणे, बजरंग खटके, श्रीरामचे संचालक संतोष खटके, जिल्हा पाणी पुरवठा समिती सदस्य विश्वास गावडे, गोखळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मनोज गावडे, माजी नगराध्यक्ष अड. बाबुराव गावडे, पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे, राहुल इवरे, भीमराव बुरुंगले, रघुनाथ ढोबळे, सैनिक बँकेचे संचालक दत्तात्रय शेंडे, तानाजी बापू गावडे, मंदाकिनी सस्ते, कमलाकर ठणके, मनोहर माने, नंदकुमार गावडे, सर्कल ऑफिसर दिलीप कोकरे, पोलीस पाटील विकास शिंदे उपस्थित होते. सरपंच बापूराव गावडे यांनी प्रारंभी सर्व उपस्थितांचे स्वागत व मान्यवरांचे सत्कार केल्यानंतर प्रास्ताविकात १२० घरकुल योजनेविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी डिजिटल ७/१२ अनावरण ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन निलेश धापटे यांनी केले.
बापूराव गावडे यांच्या सारखे अनेक तरुण गेल्या काही वर्षात आमच्या संपर्कात आले ते उत्तम प्रकारे घडवून त्यांना सत्तेची पदे देता आली, त्यांनी ही या पदाचा उपयोग समाजासाठी केला त्यातून विविध शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचविता आल्या याचे समाधान मोठे असल्याचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आवर्जून सांगत बापूराव गावडे व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले.