दैनिक स्थैर्य | दि. २९ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
जयकुमार गोरे आणि शेखर गोरे हे तुम्ही भाऊ एकच आहात. तुम्ही दोघांनी माण-खटावचा पूर्ण बिहार करून टाकला आहे. महाराष्ट्राची संस्कृती काय आहे आणि तुम्ही काय बोलताय, हे तुम्हालाही कळेना झाले आहे. तुम्हा भावाभावाला मुंबईला फलटणमार्गेच जावे लागते. श्रीमंत रामराजे महाराजसाहेबांनी ठरवलं तर ते तुम्हाला घाटाखाली उतरू द्यायचे नाहीत, असा इशारा संग्राम अहिवळे यांनी शेखर गोरे यांनी दिला आहे.
अहिवळे पुढे म्हणाले की, तिकिट तुमच्या गुणांमुळेच कापले आहे, यात श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना दोष देण्यात काय अर्थ आहे. तुम्ही दोघेही भाऊ एकच आहात, हे तुम्ही तुमच्या कृतीतून वेळोवेळी दाखवून दिलेले आहे. जेव्हा जेव्हा आपल्या भावाला निवडणूक जड वाटत आहे, तेव्हा तेव्हा तुम्ही अशाच पध्दतीने त्यांना फायदा व्हावा म्हणून बेताल वक्तव्य करत आहात. तुम्ही आदल्या दिवशी मॅनेज झाल्यानेच गेल्या वर्षी तुमचा भाऊ काठावर पास झाला आहे, हे विसरू नका. काठावर पास झालेला एखाद्या वेळेस नापासही होऊ शकतो व यंदाच्या निवडणुकीत तो नक्कीच नापास होईल. कारण आतल्या गाठीने कॉपी करणे एवढं शक्य नाही. शरद पवार नावाच ‘स्कॉड’ लय खतरनाक आहे, ते रस्टीकेट पण करेल आणि इथून पुढे तीन टर्मला उबजारी येऊ देणार नाही.
महाराज साहेबांच्या वयावरून तुम्ही काहीही बोलताय, तुम्ही काय अमर होऊन जन्माला आला आहे काय? तुम्हीही कधी तरी थकणार आहात, तुमचेही वय होणार आहे, हे लक्षात ठेवा. वयाचा मान राखा, ही तुम्हाला शेवटची ताकिद. गेल्या वेळेसच तुम्ही असेच काहीतरी बरळल्यामुळे तुमच्या नावाचे ‘गाढव’ केले होते. आता तुम्हाला गाढव करावे लागेल. त्यामुळे तुमच्या तालुक्याचा वाद तुम्ही मिटवा, दरवेळी फलटणवर येऊ नका. तिकडे आमदार व्हा नाहीतर दोघे भावभाव मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री व्हा, तुम्हाला शुभेच्छा, असेही अहिवळे यांनी म्हटले आहे.
संग्राम अहिवळे यांनी शेखर गोरे यांना सल्ला दिला आहे की, तुम्ही जर श्रीमंत रामराजेंवर सारखंच काहीपण बोलला तर आयुष्यात आणि भविष्यातही कधी तिकिट मिळाली तरी निवडून येणार नाही, हे लक्षात ठेवावे.