
स्थैर्य, नवी दिल्ली, दि.२: काँग्रेस नेते
आणि माजी केंद्रीय मंत्री शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र
मोदींवर जोरदार शैलीत निशाणा साधला आहे. सिन्हा यांनी ट्विटरवरुन २ ट्विट
केले आहेत, त्यात म्हटलंय की, पृथ्वीवर या २ व्यक्तींना शोधणं अशक्य आहे,
एक तर मोदींचा क्लासमेट आणि दुसरा मोदींच्या हातून चहा घेतलेला ग्राहक अशा
शब्दात त्यांनी नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे.
शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितलं की, चूक
ही पाठीसारखी असते, जी स्वत:शिवाय इतरांना दिसत असते. हे दोन फोटो इन्जॉय
करा आणि मजा घ्या, कारण आरोग्यसाठी हसणं चांगले असते असंही त्यांनी म्हटलं
आहे. शत्रुघ्न सिन्हा हे अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री
होते, १९९० ते २०१५ पर्यंत ते भाजपाचे स्टार प्रचारक होते, मात्र
पक्षांतर्गत मतभेदामुळे २०१९ मध्ये त्यांनी भाजपाला रामराम केला.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शत्रुघ्न
सिन्हा यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली, तेव्हा भाजपाचे रवीशंकर प्रसाद
यांच्याकडून सिन्हा यांचा पराभव झाला. अलीकडेच बिहार विधानसभा निवडणुकीत
काँग्रेसने शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा लव सिन्हा याला पटणाच्या बांकीपूर
विधानसभेची उमेदवारी दिली आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी एका हिंदी
वृत्तवाहिनीला मुलाखत देत बिहारच्या राजकारणावर भाष्य केले.
यावेळी शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, लव,
तेजस्वी यांच्यासारख्या युवा नेत्यांमुळे बिहारमध्ये युवाशक्ती आली आहे. हे
लोक पुढे येऊन बिहारचं नेतृत्व करणार आहेत. बिहारमध्ये युवाशक्ती शानदार,
दमदार यश मिळवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच अद्यापही
बिहारमध्ये पूरग्रस्तांना आर्थिक पॅकेज दिलं नसल्याचा आरोप त्यांनी
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केला.