
स्थैर्य, फलटण, दि. ०८ ऑगस्ट : सासकल (ता. फलटण) येथे भारताच्या हरितक्रांतीचे जनक, भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त ‘शाश्वत शेती दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमात सासकल येथील सहाय्यक कृषी अधिकारी (कृषी सेवारत्न) यांनी डॉ. स्वामीनाथन यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच, विद्यापीठाने शिफारस केलेल्या नवीन तंत्रज्ञानाविषयी शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. यापुढे ७ ऑगस्ट हा दिवस ‘शाश्वत शेती दिन’ म्हणून साजरा केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रगतशील बागायतदार तुकाराम मुळीक यांच्या हस्ते डॉ. स्वामीनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यांनी यावेळी आपले मनोगतही व्यक्त केले. कार्यक्रमाला नामदेव मुळीक, अरुण घोरपडे, मधुकर घोरपडे, दिलीप फडतरे, दादासो मुळीक यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.