‘शरयु’चा उच्चांकी दर; उसाला मिळणार ३४०० रुपये, युगेंद्र पवारांची घोषणा


शरयु ऍग्रो इंडस्ट्रिजने २०२५-२६ हंगामासाठी ३४०० रुपये उच्चांकी ऊस दर जाहीर केला आहे. पहिली उचल ३२०० रुपये मिळणार असल्याची माहिती युगेंद्र पवार यांनी दिली. वाचा सविस्तर.

स्थैर्य, फलटण, दि. 14 डिसेंबर : फलटण तालुक्यातील कापशी येथील शरयु ऍग्रो इंडस्ट्रिज लि. ने चालू गळीत हंगामासाठी (२०२५-२६) उसाला प्रति टन ३४०० रुपये असा उच्चांकी दर जाहीर केला आहे. कारखान्याचे कार्यकारी संचालक युगेंद्र पवार यांनी ही महत्त्वाची घोषणा केली असून, यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दराचे स्वरूप आणि हप्ते

शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत शरयु प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. जाहीर केलेल्या दराप्रमाणे शेतकऱ्यांना पहिली उचल ३२०० रुपये प्रति टन दिली जाणार आहे. तर उर्वरित २०० रुपये दिवाळी सणापूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केले जातील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पहिल्या पंधरवड्यात गाळपासाठी आलेल्या संपूर्ण उसाचे बिल पुढील दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

गेटकेन उसासाठी ३३०० रुपये

सोलापूर आणि सांगली यांसारख्या दूरच्या भागातून येणाऱ्या ‘गेटकेन’ उसासाठीही कारखान्याने धोरण स्पष्ट केले आहे. या उसाला पहिली उचल ३२०० रुपये दिली जाईल. तसेच दिवाळीपूर्वी कोणतीही कपात न करता त्यांना १०० रुपये देऊन एकूण ३३०० रुपये दर अदा केला जाणार आहे.

तोडणीचे चोख नियोजन

शरयु ऍग्रो ने ऊस तोडीसाठी फलटणसह वाई, खंडाळा, भोर, वेल्हा, पुरंदर, जावली, सातारा, कोरेगाव, माण-खटाव, माळशिरस, इंदापूर आणि बारामती आदी भागात योग्य नियोजन केले आहे. यंदा तोडणीसाठी मुबलक यंत्रणेसह १५ अत्याधुनिक हार्वेस्टर मशीन्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

शेतकऱ्यांना आवाहन

शरयुने अडचणीच्या काळातही शेतकऱ्यांचे वेळेत गाळप करून त्यांना आर्थिक स्थिरता देण्याचा प्रयत्न केला आहे. कार्यकारी संचालक युगेंद्र पवार यांनी आवाहन केले आहे की,

“शेतकरी बांधवांनी घाई गडबड न करता, आपला संपूर्ण पक्व झालेला ऊस शरयुला गाळपासाठी देऊन सहकार्य करावे. शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”


Back to top button
Don`t copy text!