
स्थैर्य, फलटण, दि. १५ ऑक्टोबर : तालुक्यातील शरयु साखर कारखान्याची सन २०२५-२६ च्या गळीत हंगामाची तयारी पूर्ण झाली असून, येत्या १ नोव्हेंबरपासून हंगाम सुरू होणार आहे. यावर्षी १० लाख टनांहून अधिक ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यासाठी आवश्यक असलेली तोडणी आणि वाहतूक यंत्रणा कार्यक्षेत्रात दाखल झाली आहे. नुकताच कारखान्याचे कार्यकारी संचालक युगेंद्र पवार यांच्या हस्ते ११ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ पार पडला.
कापशी येथील शरयु साखर कारखाना कार्यस्थळावर झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात संचालक अविनाश भापकर आणि कमलताई भापकर यांच्या हस्ते होम-हवन आणि नवग्रह पूजेने झाली. त्यानंतर कार्यकारी संचालक युगेंद्र पवार यांनी बॉयलर प्रज्वलित करून हंगामाचा श्रीगणेशा केला. कारखाना व्यवस्थापन आगामी हंगामासाठी पूर्णपणे तयार असल्याचे चित्र यातून स्पष्ट झाले.
शरयु कारखान्याने तालुक्यात सर्वाधिक ऊस दर देण्याची आपली परंपरा याहीवर्षी कायम राखली आहे. मागील हंगामात गाळप झालेल्या उसाला ३१०० रुपये प्रति टन इतका उच्चांकी दर देण्यात आला. ही रक्कम कोणत्याही कपातीशिवाय एकरकमी आणि वेळेवर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे, ज्यामुळे ऊस पुरवठादार शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने ऊस क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन कारखान्याने गाळपाचे उद्दिष्ट वाढवले आहे. फलटण, कोरेगाव, सातारा, वाई, खंडाळा, माळशिरस, भोर, पुरंदर, बारामती आणि इंदापूर या तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला ऊस शरयु कारखान्याला गाळपासाठी द्यावा, असे आवाहन युगेंद्र पवार यांनी केले आहे.
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कारखाना आधुनिक तंत्रज्ञानाचाही अवलंब करत आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञान योजनेत शरयु कारखान्याचा समावेश झाला असून, कार्यक्षेत्रातील सुमारे २०० शेतकऱ्यांनी यासाठी नोंदणी केली आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर करून आपले उत्पादन वाढवावे, असे आवाहन पवार यांनी केले. तसेच, शेतकऱ्यांसाठी लवकरच उच्च दर्जाची ऊस रोपवाटिका आणि दर्जेदार जैविक खते उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
दरम्यान, आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कारखान्याने शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली आहे. गतवर्षी ऊस गाळपास घालणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति टन एक किलो याप्रमाणे सवलतीच्या दरात साखरेचे वाटप पूर्ण झाले आहे. कारखान्याच्या मुख्य कार्यालयासह विविध गट कार्यालयांमधून हे वाटप करण्यात आले, ज्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.