
स्थैर्य, फलटण, दि. ३० ऑक्टोबर : येथील शरयु ऍग्रो इंडस्ट्रीजच्या ११ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ गुरुवारी (दि. ३०) कारखाना कार्यस्थळावर कार्यकारी संचालक युगेंद्र पवार यांच्या हस्ते झाला.
शरयु कारखान्याने मागील वर्षी गाळप झालेल्या उसाचे एकरकमी बिल शेतकऱ्यांना विनाकपात अदा केले आहे. तसेच, दिवाळीपूर्वीच प्रति टन एक किलोप्रमाणे सवलतीच्या दरात साखर वाटप केल्यामुळे शेतकरी वर्गात विश्वास निर्माण झाला आहे.
संपूर्ण कार्यक्षेत्रात तोडणी यंत्रणा सज्ज झाली असून, १ नोव्हेंबरपासून कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. फलटण, खंडाळा, वाई, सातारा, माण-खटाव, माळशिरस, इंदापूर, बारामती आणि पुरंदर तालुक्यांतून मोठ्या प्रमाणात ऊस नोंदी झाल्या असून, शेती विभागाने ऊस तोडीचे नियोजन केले आहे.
चालू हंगामातही उसाला सर्वोत्तम दर दिला जाईल, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस शरयुला घालावा, असे आवाहन युगेंद्र पवार यांनी केले. या हंगामात सुमारे १० लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, आसवनी व सहवीज निर्मिती प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यरत राहणार आहेत.
कार्यक्रमास संचालक अविनाश भापकर, युनिट हेड विजय जगदाळे, ऊस उत्पादक ज्ञानदेव कदम यांच्यासह वरिष्ठ विभाग प्रमुख, कर्मचारी, शेतकरी आणि वाहतूक ठेकेदार उपस्थित होते.
 
					 
					 
					 
					
 
					 
					 
					 
					 
					 
					