शरणकुमार लिंबाळे यांच्या हस्ते साहित्य संमेलनाच्या मंडप उभारणीचा मंगळवारी शुभारंभ


स्थैर्य, सातारा, दि. 15 डिसेंबर : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या सातारा येथे होत असलेल्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ सरस्वती सन्मान प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांच्या हस्ते मंगळवारी होत आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शाहूपुरी आणि मावळा फौंडेशनतर्फे दि. 1 ते 4 जानेवारी 2026 या कालावधीत शाहू स्टेडियम येथे हे संमेलन होत आहे. मंडप उभारणी शुभारंभ कार्यक्रम मंगळवार, दि. 16 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शाहू स्टेडियम येथे होत असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले असणार आहेत. सातारचे जिल्हाधिकारी संतोष पाटील, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह सुनिताराजे पवार यांची सन्मानीय उपस्थिती असणार आहे, अशी माहिती 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत, कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.

छत्रपती शाहू स्टेडियम येथे 1993 साली 66वे संमेलन झाले होते. हे स्टेडियम 14 एकरात असून येथे मुख्य मंडप, इतर मंडप, ग्रंथ प्रदर्शन, कवी-गझल कट्टा, तसेच भोजन व्यवस्था करण्यात येणार आहे. हे स्टेडियम सातारा बस स्थानकापासून पायी चालत जाण्याच्या अंतरावर असून शहराच्या मध्यभागी असल्याने शहरातील आणि बाहेरून येणार्‍या साहित्य रसिकांना येण्या-जाण्यासाठी सोयीचे आहे. पार्किंगची व्यवस्था स्टेडियमच्या आजूबाजूस करण्यात येणार आहे.


Back to top button
Don`t copy text!