‘जय जगदंबे’च्या जयघोषात शारदीय नवरात्रोत्सास जिल्ह्यात प्रारंभ


सातारा – ढोल व ताशा वादनात श्रीभवानी नवरात्र मंडळाच्या दुर्गादेवीची काढण्यात आलेली मिरवणूक. (छायाचित्र – अतुल देशपांडे, सातारा)

स्थैर्य, सातारा, दि. 23 सप्टेंबर : भक्ती आणि शक्तीचे प्रतीक असलेल्या अश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदा ते विजयादशमी अर्थात दसरा दरम्यान साजरा होणार्‍या शारदीय नवरात्र उत्सवाला ‘जय अंबे, जगदंबे’ ..च्या जयघोषात मोठ्या धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला. सालाबादप्रमाणे सातारा जिल्ह्यातील अनेक देवी मंदिरांमध्ये हा भक्ती आणि शक्तीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. दरवर्षी अश्विन शुद्ध प्रतिपदेला नवरात्राची सुरुवात होऊन विजयादशमीला या उत्सवाची सांगत होते .आज या नवरात्रातील पहिली माळ व घटस्थापनेचा मुहूर्त दुपारी 11 वाजेपर्यंत असल्यामुळे घरोघरी मोठ्या धार्मिक वातावरणात देवी स्तुती, स्तोत्रे आणि मंत्र जागर करत घटस्थापना करण्यात आली .अनेकांनी आपल्या घरात देवांचे देवघरापुढे वेदीवर घटस्थापना करून विविध सप्तधान्न्यांची पेरणी करत नवरात्रातील शेताची पेरणी ही केली. पहिल्या माळेला विड्याच्या पानांची तसेच पिवळ्या फुलांची माळ अर्पण करून देवतेच्या विशेष करून कुलदेवता असलेल्या देवीच्या प्रतिमेला पुष्पहार घालून महाआरती, महाप्रसाद दाखवून घटस्थापना करण्यात आली.

सातारा जिल्ह्यातील श्री क्षेत्र औंध येथील मूळ पीठ निवास यमाई देवी मंदिरातह हा नवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.औंध गावातील राजवाड्यातील यमाई देवीचे स्थान असलेल्या मंदिरातही हा उत्सव सुरू झाला .सातारा जिल्ह्यातील वाईनजीच्या मांढरदेव येथील श्री काळेश्वरी अर्थात काळुबाई मंदिरातही नवरात्री उत्सवाचा विशेष उत्साह दिसून येत आहे .सातारा जिल्ह्यातील वाठार स्टेशनच्या श्री क्षेत्र देऊर येथील मुधाई देवी मंदिर तसेच राजघराण्याची कुलदेवता असणार्‍या श्रीक्षेत्र प्रतापगड येथेही तुळजाभवानी मंदिरात आज सकाळीच घटस्थापना करून नवरात्री उत्सवाला प्रारंभ झाला .

श्री.छ. खासदार श्री उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर येथील निवासस्थानी असलेल्या श्री तुळजाभवानीची ही विधिवत प्राणप्रतिष्ठा करून नवरात्र उत्सवाला पारंपारिक पद्धतीने सुरुवात झाली. अनेक भक्तांचे कुलदैवत असलेल्या औंध येथील यमाई मंदिरात विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सातारा शहरातील विविध देवी मंदिरामध्ये महिला वर्गामध्ये विशेष उत्साह दिसून येत आहे. राजवाडा परिसरातील पंचपाळे हौद परिसरातील श्री दुर्गादेवी मंदिरातही विशेष सालंकृत पूजा बांधण्यात आली होती. आता पुढील नऊ दिवस विविध रूपातील देवीची पूजा केली जाणार असल्याचे मंदिर व्यवस्थापन समितीने सांगितले . मंगळवार तळे परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून असलेल्या श्री तुळजाभवानी मंदिरात तसेच पोलीस मुख्यालया नजीकच्या तुळजाभवानी मंदिर, पवई नाका परिसरातील फोडजाई मंदिर, माची पेठेतील सप्तशृंगी देवीचे स्थान असलेल्या सदाशिव सपकाळ यांच्या सप्तशृंगी मंदिरात, शनिवार पेठ येथील श्री रेणुका मंदिर तसेच अजिंक्यतारा किल्ल्यावरील ग्रामदैवत असलेल्या श्री मंगळाई देवी मंदिर तसेच तटाखालील मंगळाई देवी मंदिरात नवरात्रीचे आयोजन करण्यात आले आहे.

सातारा शहरात विविध संस्थांच्यावतीने शेवटचे पाच दिवस रास दांडिया आणि गरबा नृत्य कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले असून या निमित्त विविध स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. दरवर्षी नवरात्र म्हटली की हा उत्सव व्रत,वैकल्य, उपवास यांनी साजरा होतो .नवरात्रीनिमित्त अनेक महिलांनी यासाठी नऊ दिवस उपवास केला असल्यामुळे फराळाचे पदार्थ विक्रीसाठीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध करण्यात आले आहेत. तसेच देश-विदेशातील विविध चवींची फळे ही मोठ्या प्रमाणात विक्रीस उपलब्ध झाली आहे. नवरात्रीमध्ये विड्याच्या पानांना विशेष महत्त्व असल्यामुळे सध्या विड्याची पाने ,कमळ फुले ,कारळा फुले, सुवासिक गजरे ,शेवंती,गुलाब या फुलांना ही विशेष मागणी असून त्यांचे भाव आवाक्या बाहेर गेले आहेत. विविध मिठाई दुकानातून मिठाईचे पदार्थ मोठ्या प्रमाणात नैवेद्यासाठी घरोघरी नेले जातात, म्हणून त्यांनाही मोठी मागणी आहे.

आज सकाळी 11 वाजता सिटी पोस्ट च्या श्री भवानी नवरात्र मंडळाच्या दुर्गादेवीची मिरवणूक काढून प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी मिरवणुकीत विविध रंगाच्या महा रांगोळ्या तसेच हळदीकुंकवाचे सडे टाकण्यात आले होते. जय अंबे, जगदंबे ..आई अंबाबाईचा उदो उदो ..अशा जयघोषात मिरवणूक मोठ्या उत्साहात मंडपात आणण्यात आली. गेले दोन दिवस शहरातील अनेक मान्यवर दुर्गादेवी मंडळांच्या दुर्गा मूर्ती वाजत गाजत मंडपात आणण्यात आले असून त्यांची प्रतिष्ठापना रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

 


Back to top button
Don`t copy text!