महाराष्ट्राच्या विकासामध्ये शरद पवारांचे मोठं योगदान : श्रीमंत संजीवराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १३ डिसेंबर २०२१ । फलटण । राज्याचा सर्वांगीण विकासासाठी माजी केंद्रीय मंत्री, खासदार शरद पवार हे कायमच आग्रही राहिलेले आहेत. चार वेळा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली. केंद्रीय मंत्रिमंडळात संरक्षण व कृषी खात्याचा कारभारही त्यांनी चोख बजावला. महाराष्ट्राच्या विकासामध्ये शरद पवार यांचे मोठं योगदान आहे. शरद पवार आणि महाराष्ट्राचं हे जणू एक समीकरणच बनले आहे, असे मत सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्या 81 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली व्हर्चुअल रॅलीचे आयोजन फलटण येथील अनंत मंगल कार्यालय येथे करण्यात आलेले होते. त्यावेळी श्रीमंत संजीवराजे बोलत होते. यावेळी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण, फलटण पंचायत समितीचे सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, महानंदचे उपाध्यक्ष डि. के. पवार, श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, फलटण दुध संघाचे चेअरमन धनंजय पवार यांच्यासह फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य, फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक, नगरसेविका, फलटण पंचायत समितीचे सदस्य व विविध संस्थाच्या पदाधिकाऱ्यांसह तालुक्यातील विविध मान्यवरांची उपस्थिती होती.

 

81 वर्षांनंतरही शरद पवार एखाद्या तरुणासारखे सक्रिय आहेत. जनतेशी थेट संवाद असलेले, हवेत गप्पा न मारणारे आणि आजही तरुणांना लाजवतील असे काम करणारे नेते म्हणजे पवार साहेब आहेत. त्यांनी कृषी, संरक्षण क्षेत्रात ठोस पावले उचलली. महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे नेतृत्व करणारे व्यक्तीमत्व म्हणजे शरद पवार होय. खासदार शरद पवार यांना दिर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना आज वाढदिवसाच्या निमित्ताने करतो, असे मत श्रीमंत संजीवराजे यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे किमयागार आहेत. जे काम कोणाकडूनही होणार नाही; ते काम तेच करु शकतात, हे आपण सर्वांनीच वेळोवेळी पाहिले आहे. माणसामधील क्षमता आणि गुणवत्ता पडताळण्याची हातोटी त्यांच्याकडे आहे. त्यामुळेच क्षमता ओळखून समाजातील शेवटच्या घटकाला सुध्दा पवार साहेब बरोबर ओळखतात. आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांना दिर्घायुष्य लाभो, अश्या सदिच्छा फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केल्या.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या खासदार शरद पवार यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण अनंत मंगल कार्यालय, फलटण येथे प्रकाशित करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!