स्थैर्य, दि.११: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मराठा आरक्षणासह कंगना रनोट प्रकरणावर भाष्य केले आहे. सुप्रीम कोर्टाने नुकतेच मराठा आरक्षण रद्द केले आहे. यावर बोलताना पवार म्हणाले की, भाजप सरकारने दिलेलं आरक्षण सुप्रीम कोर्टाने नाकारलं आहे. तसेच मराठा आरक्षणावरुन केंद्र-राज्य असा वाद व्हावा असे आम्हाला वाटत नाही. तसेच विरोधी पक्ष याप्रकरणावरुन राजकारण करत असल्याची टीकाही त्यांनी केली.
…तर मार्ग निघू शकतो
मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने अध्यादेश काढायचा निर्णय घेतला, तर मार्ग निघू शकतो. मला त्याबाबत कायदेशीर बाजू माहिती नाही. जर त्याबाबतचा पर्याय निघाला, तर कुणीही रस्त्यावर उतरणार नाही असं मला वाटतं असंही पवार म्हणाले.
कोर्टात जे वकील दिले ते लहान नव्हते
मराठा आरक्षणाविषयी बाजू मांडणाऱ्या वकिलांविषयी बोलताना पवार म्हणाले की, मराठा आरक्षणप्रकरणात जे वकील दिले ते ख्यातनाम होते. कपिल सिब्बल किंवा महाधिवक्ते हे ज्युनिअर आहेत का? असा सवालही त्यांनी विचारला आहे. आम्हाला मराठा समाजाल न्याय द्यायचा आहे. मला कोर्टाकडून पुन्हा न्याय मिळेल असं वातावरण हवं असल्याचंही पवारांनी स्पष्ट केलं. तसेच इतर राज्यांमध्ये आरक्षण देण्यात आले, मग महाराष्ट्राने अपेक्षा केली त्याच गैर काय असाही सवाल त्यांनी केला.
पवारांचा विरोधकांवर निशाणा
मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतर राज्य सरकारवर विरोधकांकडून निशाणा साधला जातोय. यावर बोलताना पवार म्हणाले की, विरोधक यात सरकारची कमतरता सांगत आहेत. पण विरोधकांना राजकारण करायचं आहे. विरोधकांनी आंदोलन केली तरीही काही होणार नाही. हा प्रश्न कोर्टाकडूनच सुटू शकले. तसेच कोर्टाच्या निर्णयावर मी काही बोलू शकत नाही. यावर काही तरी मार्ग निघावा यासाठी आम्ही पुन्हा कोर्टात जाणार असल्याचंही ते म्हणाले.
कंगनावरील कारवाईवर काय बोलले पवार
कंगनावरील कारवाईप्रकरणी राज्य सरकारचा संबंध नाही, ती कारवाई महापालिकेची, अनेक ठिकाणी अशा कारवाया महापालिका करत असते असे शरद पवारांनी स्पष्ट केले आहे. तसेच शिवसेनेच्या भूमिकेविषयी मी भाष्य करु शकत नसल्याचंही ते म्हणाले आहेत.