स्थैर्य, दि.१९: परतीच्या पावसाने खरीप हंगामातील काढणीला आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली. पाणी ओसरताच आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह ठाकरे मंत्रिमंडळातील सात मंत्र्यांनी रविवारी बांधावर जाऊन अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी केली. दौऱ्याचे हे सोपस्कार पार पडल्यानंतर मदतीचा ‘पूर’ येणार का? असा सवाल आहे.
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना राज्यासह केंद्राचीही मदत गरजेची : शरद पवार
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे. पिकांच्या नुकसानीसह बऱ्याच ठिकाणी शेतातील मातीच वाहून गेल्याचे दिसून येत आहे. हे नुकसान सहन करण्याची क्षमता शेतकऱ्यांमध्ये नाही. त्यामुळे राज्य सरकारसह केंद्र सरकारनेही शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. पवार यांनी रविवारी उस्मानाबाद-लातूर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा केला. त्या वेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख त्यांच्यासमवेत होते. पवारांंनी तुळजापूर तालुक्यातील काक्रंबावाडी, लोहारा तालुक्यातील सास्तूर, राजेगाव, एकोंडी शिवारातील नुकसानीची पाहणी केली.