दैनिक स्थैर्य । दि. २९ एप्रिल २०२३ । मुंबई । अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी भाकरी फिरवली नाही तर ती करपेल, आता भाकरी फिरवण्याची वेळ आलीय, त्यामुळे उशीर करून चालणार नाही असं विधान केले होते. त्यामुळे पक्षांतर्गत मोठे फेरबदल होतील अशी चर्चा होती. त्यात आता पवार घराण्यातील तिसरी पिढी म्हणून पुढे आलेले कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना मोठी जबाबदारी मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे.
राज्य विधिमंडळाच्या अत्यंत महत्त्वाच्या समितीपैकी लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदासाठी रोहित पवार यांचे नाव राष्ट्रवादीने सुचवल्याची माहिती समोर आली आहे. रोहित पवार पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आलेत. त्यात विधिमंडळातील ही महत्त्वाची समिती असलेल्या लोकलेखा समितीचे अध्यक्षपदी त्यांची वर्णी लागणार असल्याने शरद पवारांनी भाकरी फिरवल्याचं म्हटलं जात आहे. लोकलेखा समिती नियंत्रक आणि महालेखा परिक्षण(CAG) च्या अहवालाची छाननी करते. विशेष म्हणजे विरोधी पक्षातील आमदार या समितीचा प्रमुख असतो. या समितीत विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांचा समावेश असतो.
शिंदे-फडणवीस सरकार येऊन ९ महिने झाले तरी लोकलेखा समितीची स्थापना झाली नव्हती. मात्र आता ही समिती पुर्नगठीत करण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी सरकारने हालचाली सुरू केल्यात. सध्या विधानसभेत राष्ट्रवादी मोठा विरोधी पक्ष आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने या पदासाठी आमदार रोहित पवारांच्या नावाची शिफारस केल्याचे म्हटलं जात आहे. याबाबत अद्याप पक्षाकडून मला काहीही सांगण्यात आले नाही. मात्र जर पक्षाने मला कुठली जबाबदारी दिली तर मी राज्याच्या भल्यासाठी काम करेल असा विश्वास आमदार रोहित पवारांनी व्यक्त केला.
रोहित पवारांच्या नावाला राष्ट्रवादीतूनच विरोध?
आमदार रोहित पवार यांच्या नावाची चर्चा लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदासाठी होत असताना दुसरीकडे रोहित यांच्या नावाला राष्ट्रवादीतूनच विरोध असल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी रोहित पवारांना ही जबाबदारी देण्यास विरोध केला आहे. लोकलेखा समितीचे अध्यक्षपद हे फार महत्त्वाचे असते. कारण कॅगचे रिपोर्ट छाननी करण्याचं काम ही समिती करत असते. त्याठिकाणी युवा आमदाराला संधी दिली तर अनुभवाची कमी पडू शकते असं बड्या नेत्यांना वाटते. या पदावर अनुभवी नेता द्यावा असं राष्ट्रवादीच्या एका गटाला वाटते. तर दुसरा गट नवीन आमदारांना संधी द्यावी जेणेकरून त्यांना अनुभव येईल असं म्हणत आहे. हे वृत्त टीव्ही९ने दिले आहे.