स्थैर्य, मुंबई, दि.७: मागील काही दिवसांपासून राजधानी दिल्लीत सुरू
असलेल्या शेतक-यांचं आंदोलन दिवसेंदिवस उग्र होताना दिसत आहे. कृषी कायदे
रद्द करण्याची मागणी करत दिल्लीच्या सीमेवर शेतकरी ठाण मांडून बसले आहे.
पाच वेळा बैठक होऊन कोणताही तोडगा निघालेला नसून, शेतकरी आक्रमक पवित्रा
घेताना दिसत आहे. याच विषयावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद
पवार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत.
केंद्र सरकार केलेल्या तीन कृषी
कायद्यांविरोधात शेतक-यांनी एल्गार पुकारला आहे. कायदे रद्द करण्याबरोबरच
हमीभावाची हमी देण्याची मागणी शेतक-यांकडून केली जात आहे. आपल्या
मागण्यांवर शेतकरी ठाम असून, केंद्र सरकार आणि शेतक-यांमध्ये झालेल्या
चर्चेच्या पाच फे-या निष्फळ ठरलेल्या आहेत. पाचव्या फेरीतही केंद्राकडून
ठोस आश्वासन न मिळाल्याने शेतक-यांनी ८ डिसेंबरला भारत बंदची हाक दिली आहे.
आंदोलन करणा-या शेतक-यांच्या मागण्यांसंदर्भात शरद पवारांसह विरोधी
पक्षातील नेते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. ९ डिसेंबरला
सायंकाळी ५ वाजता पवार राष्ट्ररतींची भेट घेणार असल्याचं वृत्त आहे.