दैनिक स्थैर्य । दि. ०९ मे २०२३ । मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीसोबत किती दिवस राहील ते माहीत नाही. भाजपबरोबर त्यांची बोलणी सुरू आहेत, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गोंधळाची स्थिती आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हालचाली अगोदरच चर्चेत आहेत, असेही त्यांनी म्हटले होते. एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस बरभवशाचा पक्ष असल्याच चव्हाण यांनी सूचवलं होतं. चव्हाण यांच्या या विधानसंदर्भात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, पवार यांनी चव्हाणांना खोचक टोला लगावला.
सहिष्णुता आणि धर्मनिरपेक्षता हा आपल्या देशाचा आत्मा आहे. ऑपरेशन लोटसच्या नावाखाली देशाचा हा आत्माच नष्ट करण्याची भूमिका भाजपाने घेतली असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. सातारा येथे पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६४ व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात्त पवार बोलत होते. यावेळी, त्यांना पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या टीकेसंदर्भातही प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, चव्हाण यांना खोचक टोला लगावला.
‘पृथ्वीराज चव्हाणांचं त्यांच्या पक्षात काय स्थान आहे ते ए आहे की बी, सी किंवा डी आहे हे त्यांनी आधी चेक करावं. त्यांच्या पक्षापेक्षा सहकाऱ्यांना विचारावं की यांची कॅटेगरी कोणती आहे, ते तुम्हाला खासगीत सांगतील, जाहीरपणे नाही सांगणार.’, अशी बोचरी टीका शरद पवार यांनी केली.
काय म्हणाले होते पृथ्वीराज चव्हाण
कर्नाटक निवडणुकांच्या प्रचारासाठी गेले असता पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीवर जोरदार प्रहार केला. पवार यांनी भाजप प्रवेशाच्या बातम्या नाकारल्या असल्या तरी संशयाचे धुके कायम आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी करत ते आमच्याबरोबर राहतात. मात्र, कर्नाटकात ते काँग्रेसविरुद्ध लढतात. भाजपसोबत त्यांची रोज बोलणी चालली आहेत. कोण नेता येणार, कोण जाणार याच्या सतत बातम्या येत आहेत. त्यांनी काय तो निर्णय एकदा घ्यावा, असे चव्हाण यांनी म्हटले होते. तसेच, राष्ट्रवादी ही भाजपची बी टीम असल्याचंही त्यांनी म्हटलं.