आरक्षणासाठी शरद पवारांनी पुढाकार घ्यावा, महिन्यात प्रश्न सुटेल; साता-यातील गोलमेज परिषदेत दावा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, सातारा, दि.३ : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने मराठा समाजात असंतोष पसरला आहे. मात्र, आरक्षणासंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी जर पुढाकार घेतला, तर हा प्रश्न एका महिन्यात सुटणार आहे, असा दावा मराठा आरक्षण गोलमेज परिषदेत करण्यात आला. यासंदर्भात लवकरच त्यांना निवेदन देणार असल्याचे ठरविण्यात आले.

कोडोली येथे मराठा समाजाच्या वतीने गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विविध ठराव करण्यात आले. याप्रसंगी सुरेश पाटील, विजयसिंह महाडिक, सुधाकर माने, दिग्विजय मोहिते, अनिल वाघ, दिलीप सूर्यवंशी, रेश्‍मा पाटील आदी उपस्थित होते. या परिषदेस सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर व सोलापूर या जिल्ह्यांतील मराठा समाजाच्या सर्व संघटना व प्रतिनिधी सहभागी झाले होते.

दरम्यान, गोलमेज परिषदेत सर्वांच्या विचाराने आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. याबाबत पुढील आंदोलनाची दिशा लवकर ठरवण्यात येणार असून, यासाठी सर्वोच्च न्यायालयातील याचिका दाखल केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, खासदार उदयनराजे भोसले परिषदेस उपस्थित नव्हते. 

असे आहेत ठराव 

केंद्राने आर्थिक दुर्बलांना दिलेल्या दहा टक्के आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला मिळावा.

स्थगिती उठल्यावर तातडीने नोकरभरती करावी.

शेतकऱ्यांना सरसकट वीजबिल माफ करावे. 

थोबाडीत मारो आंदोलन 

मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने विधानसभा आणि विधान परिषदेत असणारे मराठा समाजातील 181 आमदार गप्प आहेत. ते काही बोलायला तयार नाहीत. त्याचा निषेध म्हणून थोबाडीत मारो आंदोलन करण्यात येणार असल्याचा ठराव या वेळी मांडण्यात आला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!